अहमदाबाद : गुजरातमधील बोताड जिल्ह्यात बनावट आणि विषारी दारू पिऊन 42 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्याच बरोबर 100 च्या आसपास लोकांवर या विषारीदारुचा परिणाम झाला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली.आश्चर्याची बाब म्हणजे गुजरातमध्ये दारूबंदी असताना अशी घटना घडली आहे. पण त्याचबरोबर एवढे सर्व होऊन सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाने ही बातमी का ठळकपणे घेतली नाही यांचेच नवल वाटून राहिले. जर हि घटना बिगर भाजप राज्यात घडली असती तर अजूनपर्यंत वृत्तवाहिनींवर ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली धुडगूस घातला असता. वृत्तपत्रांची दोन दोन दिवस हेडलाईन राहिल्या असत्या. अशाप्रकारे या मिडीया आता जरी फायदा मिळत असला तरी भविष्यात मात्र हा मिडीया लोकांच्या विश्वासास अपात्र ठरणार.
गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी गांधीनगर येथे पत्रकारांना सांगितले, की प्राथमिक तपासानुसार, बोताडमधील एका महिलेसह काही जणांनी ‘मिथाइल अल्कोहोल’ (मिथेनॉल) पाण्यात मिसळून बनावट दारू बनवली होती. हे रसायन अत्यंत विषारी असते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दारू ते ग्रामस्थांना प्रति छोटी पिशवी २० रुपये दराने विकायचे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
‘विक्रेत्यांना राजकीय आश्रय’- आपचा आरोप
या वर्षांच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरातच्या दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री व आप पक्षप्रमुख अरिवद केजरीवाल यांनी राज्यात दारूबंदी लागू असूनही अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप सोमवारी केला होता. अवैध दारू विक्री करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप करत केजरीवाल यांनी दारूविक्रीतून कमावलेल्या पैशाची चौकशी करण्याची मागणी केली. भावनगरमध्ये एका रुग्णालयात ही दारू घेतल्याने अत्यवस्थ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयात आपण जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
मृत्युमुखी पडलेल्यांच्या रक्तनमुन्यात त्यांनी मिथेनॉलचे सेवन केल्याचे निदर्शनास आले आहे. भाटिया यांनी सांगितले, की १४ लोकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अहमदाबाद गुन्हे शाखाही तपासात सहभागी आहेत.
सोमवारी सकाळी बोताडच्या रोझीद गाव व परिसरातील इतर गावांत राहणाऱ्या काही जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना बरवाला परिसर आणि बोताड शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. भाटिया यांनी सांगितले, की आतापर्यंत ३३ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी २२ जण बोताड जिल्ह्यातील वेगवेगळय़ा गावांतील रहिवासी आहेत. उर्वरित सहा जण शेजारच्या अहमदाबाद जिल्ह्यातील तीन गावांतील रहिवासी आहेत. याशिवाय भावनगर, बोताड आणि अहमदाबाद येथील रुग्णालयांमध्ये ४५ हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत.
त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन
दरम्यान, राज्य सरकारने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की गुजरातच्या गृह विभागाने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकारी सुभाष त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.