मुंबई : माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई तर्फे ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरु झालेल्या आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट स्पर्धेत सिटी को-ऑप.बँक, एनकेजीएसबी को-ऑप. बँक संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिटी बँकेने बलाढ्य मंत्रालय बँकेला ९ विकेटने पराभूत केले. मिनील सावंतने १० चेंडूत २९ धावांची आतषबाजी केल्यामुळे सिटी बँकेने ४२ धावांचे विजयी लक्ष्य एका विकेटच्या मोबदल्यात पार केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अजिंक्य नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे शानदार उद्घाटन शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर झाले.
अष्टपैलू मोहित म्हात्रेच्या १२ चेंडूत १८ धावा आणि ८ धावांत २ बळीच्या करामतीमुळे एनकेजीएसबी बँकेने नेव्हल डॉकयार्ड को-ऑप. बँकेला ३३ धावांनी नमविले. विजयासाठी ५५ धावांचा पाठलाग करतांना नेव्हल डॉकयार्डचा संघ २१ धावांच करू शकला. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विमा कामगार बँकेने डीएमके जावळी बँकेचा ४ धावांनी, ठाणे भारत सहकारी बँकेने ग्रेटर बॉम्बे को-ऑप. बँकेचा ३१ धावांनी, मुंबै बँकेने हिंदुस्थान को-ऑप. बँकेच्या ब संघाचा ८ धावांनी तर हिंदुस्थान को-ऑप. बँकेच्या अ संघाने सातारा सहकारी बँकेचा ३६ धावांनी पराभव केला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे, भार्गव धारगळकर, प्रवीण शिंदे आणि इतर पदाधिकारी कार्यरत आहेत.