शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर या बंडखोरीमागे नेमकी काय कारणं? कोण जबाबदार? यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या बंडानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दिलीय. यात त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीमागील कारणं आणि शिवसेनेचा पुढील राजकीय प्रवास यावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी ते रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केलाय. ही मुलाखत ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली.
“तुम्ही रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना तुमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता,” असं म्हणत संजय राऊत यांनी पक्षातील बंडखोरांबाबत विचारणा केली. यावर उद्धव ठाकरेंनी त्या विषयावर बोलू का? असा प्रश्न विचारला. तसेच मला माझ्या त्या अनुभवातून कुठेही सहानुभुती नको आहे, असंही नमूद करत तसा सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला.
“माझी मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती”
उद्धव ठाकरे म्हणाले, “तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रियेत काय धोके असतात हे कोणताही डॉक्टर सांगू शकेल. त्याची कल्पना मलाही होती. मात्र, ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी त्यातून व्यवस्थित बाहेर पडलो. पाच-सहा दिवसांनी सकाळी जाग आल्यावर आळस देण्याचा प्रयत्न केला आणि अचानक मानेत वेदना जाणवल्या. त्यानंतर माझी मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती.”
“मला श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं”
“मला तेव्हा श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं. मी पूर्णपणे निश्चल झालो होतो. मानेत एक रक्ताची गुठळी तयार झाली होती. सुदैवाने डॉक्टर जागेवर होते. त्यामुळे ‘गोल्डन आवर’मध्ये (Golden hour) ती शस्त्रक्रिया झाली. म्हणून मी तुमच्यासमोर आज उभा आहे. त्या काळात काही गोष्टींची माहिती माझ्या कानावर येत होती,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
“तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “माझे हातपाय हालत नव्हते, बोटं हलत नव्हती. त्यावेळी काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवासमोर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले आज पक्ष बुडवायला निघाले आहेत. तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं. तसेच तुझं काय होणार असं बोललं जात होतं.”
“माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या”
“पक्षप्रमुखाची शस्त्रक्रिया झाल्यावर यांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन. मी त्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, मी रुग्णालयात असताना त्यांनी विश्वासघात केला,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
“राजकारणातील ती चूक आमच्याकडून वारंवार होते”
उद्धव ठाकरे शिवसेनेतील विश्वासघाताच्या राजकारणावर बोलताना म्हणाले, “आम्ही पक्ष व्यावसायिक दृष्टीकोनातून चालवत नाही. बाळासाहेब ठाकरे, माँ यांनी आम्हाला पक्षातील नेत्यांना कुटुंब म्हणून पाहायला शिकवलं. एकदा आपलं म्हटलं की आपलं. त्यामुळे एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही अंधविश्वास टाकतो, ताकद देतो आणि राजकारणातील ती चूक आमच्याकडून वारंवार होते.”
“२०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होतं?”
“आम्ही हिंदुत्व सोडलं अशी बोंब जे मारत आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचं आहे की २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होतं? आजही शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. तेव्हा शिवसेनेला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं. तेव्हा अनेकांना वाटलं शिवसेना आता संपेल. मात्र, शिवेसना एकाकी लढली आणि ६३ आमदार निवडून आले,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.
“हे का घडवलं?”, असा प्रश्न बंडखोरीसंदर्भात उद्धव यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “हे घडलं कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे. मी अडीच-अडीच वर्ष म्हणत होतो. तेच तर आता तुम्ही (भाजपाने) केलं. निदान भारतीय जनता पक्षाला पाच वर्षात अडीच वर्ष तरी मुख्यमंत्रीपद मिळालं असतं,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी, सध्याचा बंडखोर गट हा खरी शिवसेना नसल्याचं म्हटलं. “आता जी काय सोंगं ढोंग करतायत ही खरी शिवसेना नाहीय. ही सगळी तोडफोड करुनही त्यांचं समाधान होत नाही. त्यांना शिवसेना संपवायचीय. त्यांचा (बंडखोरांचा) वापर करुन त्यांना शिवसेना संपवायची आहे,” असं उद्धव म्हणाले.
“५६ वर्षात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. मात्र त्यांना (भाजपाला) शिवसेना का संपवायची आहे असं आपल्याला वाटतं?”, असा पुढचा प्रश्न राऊत यांनी विचारला. “शिवसेना संपवायचे अनेक प्रयत्न झाले पण प्रत्येक वेळेस शिवसेना अधिक जोमाने आणि तेजाने उभी राहिली आहे,” असं सांगत उद्धव यांनी शिवसेना का संपवण्याचा प्रयत्न केला जातोय यासंदर्भातील शक्यता व्यक्त केली. “आता सुद्धा त्यांना हिंदुत्वात भागीदार नको असेल. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व मजबूत होण्यासाठी राजकारण केलं. हे जे करतायत ते राजकारणासाठी हिंदुत्व वापरत आहेत हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. जे विचारतात ना तुमच्या आणि भाजपाच्या हिंदुत्वात फरक काय आहे, तर तो हा आहे. शिवसेनेनं हिंदुत्व मजबूत करण्यासाठी राजकारण केलं. यांनी मात्र यांचं राजकारण मजबूत करण्यासाठी हिंदुत्वाचा वापर केला,” असा आरोप उद्धव यांनी केला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनच राऊत यांनी, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने हिंदुत्व संकटात आलं, असं जे म्हटलं जातंय त्याबद्दल काय सांगाल?” असा पुढचा प्रश्न विचारला. त्यावर उद्धव यांनीच प्रतिप्रश्न करताना, “हिंदुत्व संकटात आलं म्हणजे नेमकं काय झालं?” असं विचारलं. पुढे उद्धव यांनी, “मला एक प्रसंग किंवा गोष्ट किंवा मी मुख्यमंत्रीपदावर असताना घेतलेला निर्णय दाखवा की ज्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं. एक निर्णय दाखवा,” असं म्हटलं.
हिंदुत्वाच्या मुद्द्याशी जोडून मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा पाढा उद्धव यांनी वाचला. “अयोध्येत आपण महाराष्ट्र भवन करतोय हे हिंदुत्वाला जोडून आहे की नाही? मुख्यमंत्री होण्याआधी, झाल्यानंतरही मी अयोध्येला गेलो. आपण तिरुपती मंदिरासाठी नवी मुंबईत जागा दिली. प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी आपण काम सुरु केलं. गडकिल्ल्यांचं संवर्धन आपण सुरु केलं. आता यात हिंदुत्व कुठे गेलं? असा कोणताही निर्णय नाहीय की ज्यात आपण हिंदुत्वापासून दूर गेलो. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील,” असं माजी मुख्यमंत्री म्हणाले.
तुम्ही आज ज्या संघर्षमय कालखंडातून जात आहात याची कधी अपेक्षा केली होती? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव यांनी, “शिवसेना आणि संघर्ष हे एकमेकांच्या पाचवीला पुजलेले आहेत,” असं उत्तर दिलं.”मागे कोणीतरी असं म्हटलं होतं की शिवसेना ही तळपती तलवार आहे. ती जर म्यानेमध्ये ठेवली तर ती गंजते. त्यामुळे ती तळपली पाहिजे. तलवार तळपणे म्हणजे संघर्ष आलाय. आता याचा शब्दश: अर्थ कोणी घेऊ नये. तलवारीने वार करा वगैरे असं माझं म्हणणं नाही. ही एक उपमा आहे,” असं उद्धव म्हणाले. तसेच, “संघर्षासाठीच शिवसेना जन्माला आली. त्यावेळी मराठी माणसासाठी, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनाचा जन्म झाला. नंतर शिवसेना हिंदुत्वासाठी लढली. मग ते १९९२-९३ किंवा कधीही असेल. जिथे अन्याय तिथे वार हे शिवसेनेचं ब्रिद वाक्य आहे,” असंही त्यांनी म्हटलं.