ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा किशोर दास यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. झारसुगुडा येथील ब्रजराजनगर येथे दुपारी एक वाजता एएसआयने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. दास यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या. त्यानंतर त्यांना भुवनेश्वरच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.
एएसआयने गोळ्या झाडल्या
मंत्री ब्रजराजनगर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना ही घटना घडली. कारच्या पुढील सीटवर बसलेले दास आपल्या समर्थकांना भेटण्यासाठी खाली उतरताच एएसआयने त्यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. रक्ताने माखलेला दास गाडीजवळ पडले.
घटनेनंतर 7 तासांनी मृत्यू
घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या समर्थकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात नेले. काही वेळाने त्यांना भुवनेश्वरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले. घटनेनंतर सुमारे 7 तासांनी दास यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी मुख्यमंत्री नवीन पटनायक हेही दास यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.
आरोपी एएसआयला अटक
गोळीबार करणाऱ्या संशयित एएसआय गोपालदासला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे, मात्र अद्याप आरोपीने हल्ल्याचे कारण सांगितलेले नाही. येथे राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडी-गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. 7 सदस्यीय विशेष तपास पथकात सायबर, बॅलिस्टिक आणि गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या टीमचे नेतृत्व डीएसपी रमेश सी डोरा करत आहेत.
दुपारी 12.15 च्या सुमारास हल्ला
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12.15 च्या सुमारास हा हल्ला झाला. नबा दास ब्रजराजनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. कारमधून उतरताच ASI गोपालदास यांनी त्यांना गोळ्या घातल्या.नबा दास यांना उपचारांसाठी हवाई रुग्णवाहिकेद्वारे भुवनेश्वरला हलवण्यात आले होते.
हल्लेखोराचा गोळीबारानंतर पळण्याचा प्रयत्न
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आरोग्यमंत्री नबा दास या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली होती. तेव्हा अचानक कुणीतरी त्यांच्यावर गोळीबार केला. एक पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. त्यानंतर तो पळून जात असताना आम्ही पाहिले.
CM म्हणाले – हल्ल्याचे वृत्त स्तब्ध करणारे
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या आरोग्यमंत्र्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, हल्ल्याचे वृत्त ऐकून स्तब्ध झालो. गुन्हे अन्वेषण विभागाला मी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिलेत.
झारसुगुडा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर
नबा किशोर दास यांनी 2004 मध्ये ओडिशाच्या झारसुगुडा मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2014 मध्येही ते काँग्रेसकडून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ते या जागेवरून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. नबा दास या क्षेत्रातील एक प्रभावशाली नेते मानले जातात.
ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांत समावेश
नबा किशोर ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 15 कोटींहून अधिकच्या किंमतीची जवळपास 70 वाहने आहेत. त्यात एका मर्सिडीज बेंझचाही समावेश आहे. या कारची किंमत जवळपास 1.14 कोटी रुपये आहे.
विधानसभेत पॉर्न पाहताना पकडले गेले होते
2015 साली विधानसभेच्या अधिवेशनात नबा किशोर दास सभागृहातच अश्लिल व्हिडिओ पाहताना दिसून आले होते. त्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्यांना आठवडाभरासाठी निलंबित केले होते. या प्रकरणी नबा दास म्हणाले होते की, मी माझ्या आयुष्यात एकदाही अश्लिल व्हिडिओ पाहिला नाही. इंटरनेट वापरत असताना चुकून हा प्रकार घडला. पण चूक लक्षात येताच मी ती दुरुस्त केली.