मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून ठाकरे गटाला (Thackeray Group) धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा दिवसेंदिवस विस्तार मोठा होत जातोय.
परभणी : शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं नाव आणि चिन्हावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सध्या सुनावणी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून ठाकरे गटाला (Thackeray Group) धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा विस्तार दिवसेंदिवस मोठा होत जातोय. ठाकरे गटातील अनेक लोकप्रतिनिधींनी शिंदे गटात प्रवेश केलाय. राज्यभरातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदे यांचं हे धक्कातंत्र कायम असून यावेळी त्यांनी फक्त ठाकरे गटालाच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. परभणी जिल्ह्यातील तब्बल 84 सरपंचांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
‘…म्हणून पक्षप्रवेश होत आहेत’, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सर्वाधिक पक्षप्रवेश होत आहेत. आज 84 सरपंचांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये युती सरकारने चांगलं काम केलं आहे. त्यामुळे लोक पक्षामध्ये प्रवेश करत आहेत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाणे शहर ,जितूर ,महाराष्ट्रतील काही कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील आणि मुंबईतील नगरसेवक यांना असं वाटतंय की हे सरकार चांगलं काम करत आहे. म्हणून ते पक्ष प्रवेश करत आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
“जुनी पेशन संदर्भात सरकार अभ्यास करत आहे. शिक्षकांचे देखील सर्व प्रश्न सोडले आहेत. हे देखील लवकर लागू होईल”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
राष्ट्रवादीने दावा फेटाळला
दुसरीकडे परभणीच्या पाथरीत 40 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली होती. संबंधित बातमीचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून खंडन करण्यात आलंय.
शिंदे गटाकडून निधीचा आमिष दाखवण्यात येतोय. निधीचा आमिष दाखवून केवळ एका सरपंचाचा प्रवेश झालाय, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. दरम्यान, पक्षप्रवेशाची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पेजवरून प्रकाशित करण्यात आलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटाच्या दाव्याचा खंडन करत परभणीत सरपंचाची ओळख परेड करण्यात आलीय, अशी माहिती समोर आलीय. पाथरी तालुक्यातील केवळ एका सरपंचाने शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.