राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी गोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पुणे : माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा २४ डिसेंबरला मध्यरात्री तीन वाजता अपघात झाला. फलटण तालुक्यातील मलठण येथे बाणगंगा नदीत कार कोसळल्यानं जयकुमार गोरे यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर, स्वीय सहाय्यक आणि पोलीस सुरक्षारक्षक जखमी झाला. जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात तर इतर तिघांना बारामतीमध्ये दाखल करण्यात आलं. जयकुमार गोरे यांच्या अपघाताची बातमी समजताच भाजपमधील त्यांचे सहकारी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रुबी रुग्णालयात दाखल झाले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे तर अपघात स्थळापासून जयकुमार गोरेंना रुबी रुग्णालयात दाखल करेपर्यंत उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जयकुमार गोरे यांची भेट प्रकृतीची चौकशी केली. जयकुमार गोरे यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
देशातील राजकारणापेक्षा महाराष्ट्राचं राजकारण वेगळं असल्याचं कायम बोललं जातं. महाराष्ट्रात राजकीय पक्षांचा भेद विसरुन नेते संबंध जपतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील सुस्कृतपणा देशासाठी कायमच आदर्शवत राहिला आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना लवकरच संसदेत भेटण्याचा शब्द शरद पवार यांनी दिला होता. आज शरद पवार यांनी भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची रुबी रुग्णालयात जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
जयकुमार गोरे यांचं ट्विट
जयकुमार गोरे यांचं संपूर्ण राजकारण राष्ट्रवादी विरोधात
जयकुमार गोरे सध्या भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष असून माण खटावचे आमदार आहेत. जयकुमार गोरे यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. सातारा जिल्ह्याता त्यांचा प्रमुख संघर्ष हा राष्ट्रवादी सोबत राहिला आहे. माण खटाव हा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. मात्र, जयकुमार गोरेंनी या मतदारसंघातून सलग तीनदा विजय मिळवला आहे. पहिल्यांदा अपक्ष, दुसऱ्यांदा काँग्रेस आणि तिसऱ्यावेळी भाजपच्या तिकिटावर ते विजयी झाले. तिन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केला.
जयकुमार गोरे देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबातील नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, पक्षीय राजकारण करताना महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा विसरायचा नाही हे शरद पवार यांनी जयकुमार गोरे यांच्या घेतलेल्या भेटीतून दाखवून दिलं.