मुंबई : अलिकडे देशात विशेषतः औद्योगिक क्षेत्रात व्यवसायजन्य सुरक्षितता आणि आरोग्यासंबंधी वाढती जागरूकता दिसत असून, त्यायोगे उत्पादकता वाढून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चांगले योगदान मिळत असल्याने सरकारकडूनही अशा उपायांना चालना दिली जात आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी आणि सुविधा पुरविल्या गेल्यास, जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) तीन ते पाच वर्षात सहा टक्क्यांचे, तर भारताच्या जीडीपीत १० टक्के वाढीचे योगदान दिले जाऊ शकेल, असे प्रतिपादन मुंबईत आयोजित ‘ओएसएच इंडिया २०२२’ची १० व्या आवृत्तीच्या गुरुवारी झालेल्या उद्घाटनसत्रात उपस्थितांनी केले.
व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य उद्योगासाठी सर्वात प्रतिष्ठित व्यापार प्रदर्शन ‘ओएसएच इंडिया’ २४ ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई येथे इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाद्वारे त्याचे आयोजन करण्यात आले होते. वाढती जागरूकता आणि जागतिक सर्वोत्तम पद्धती अनुसरण्यासह भारतात कामाच्या ठिकाणी अपघात तसेच जिवित व मालमत्ता हानीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या सुविधेसाठी केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचे फायदे मोठे असल्याचे दिसून येत आहे, असे ‘सामा’ या व्यावसायिक सुरक्षा उपकरणांचे निर्माते, वितरक, विक्रेते आणि सेवाप्रदात्यांची संघटनेचे अध्यक्ष (तांत्रिक) महेश कुडव यांनी सांगितले. देशांतर्गत हेल्मेट, बूट, ग्लोव्हज्, मास्क अशा सुरक्षा साधनांच्या निर्मितीने खर्चात किफायतशीरतेसह, गुणवत्तेत मोठी मजल मारता आली आहे. ‘मेक इन इंडिया’ धोरणाचेच हे फलित असल्याचे नमूद करीत, कुडव यांनी दर्जेदार सुरक्षा साधनांच्या निर्यातीत भारतीय उद्योग वेगाने प्रगती करीत असल्याचे सांगितले.
या दोन दिवसांच्या प्रदर्शनामध्ये एकूण १६० प्रदर्शक त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने घेऊन सामील झाली, त्यातील ९० टक्क्यांहून अधिक उत्पादने ही भारतातच तयार केली गेली आहेत, असे इन्फॉर्मा मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास यांनी सांगितले. या क्षेत्रातील जागतिक गुंतवणुकीत वाढ होत असून, प्रदर्शनाच्या निमित्ताने जगभरातील पुरवठादार आणि सेवा प्रदात्यांना त्यांच्या नवकल्पना, उत्पादन नाविन्य आणि ज्ञान मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याची मोठी संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मुद्रास यांच्या मते, हे प्रदर्शन १०० हून अधिक संम्मेलन वक्त्यांसह ६००० हून अधिक व्यापार अभ्यागतांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे.