मुंबई : ‘मराठी नाट्य कलाकार संघा’ च्या वतीने २०१४ सालापासून जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो.
रंगभूमीवर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या सक्रिय रंगकर्मींचाही हक्काचा एक दिवस असावा, या उद्देशाने ज्यांनी रंगभूमीवर सर्वस्व वाहिले आहे, अशा भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हा दिवस “जागतिक रंगकर्मी दिवस” म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मींचा सत्कार करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान व शोभा प्रधान, गंगाराम गव्हाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ या मान्यवर ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांच्या लाडक्या “आऊ” *श्रीमती उषा नाडकर्णी* यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मुलाखतीतून ‘आऊं’शी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे.
गेल्यावर्षी पासून कलाकार संघाने गरजू वृद्ध कलाकारांना आर्थिक सहाय्य निधी योजना सुरू केली असून, ब-याच दानशूर कलावंतानी या योजनेसाठी निधी दिला आहे . या वर्षी १४ जणांना या धनादेश चे वाटप करण्यात येणार आहे.
सदर जागतिक रंगकर्मी दिवस सोहळा शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी दामोदर नाट्यगृह परळ येथे सायं.०६ वा. आयोजित करण्यात आला आहे.
यादिवशी श्री.ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
“हा जागतिक रंगकर्मी दिवस सोहळा सर्व कलाकारांनी एकत्र येऊन साजरा करावा हा संघाचा मानस आहे. त्यामुळे ज्येष्ठ श्रेष्ठ व भावी रंगकर्मी व नाट्य रसिकांची उपस्थिती प्रार्थनीय असून आपण या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे”, असे आवाहन मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी केले आहे.
“सदर कार्यक्रम विनामूल्य असून या सोहळ्यात सामान्य नाट्य रसिकांसाठी देखील मनोरंजन व आनंदाची मेजवानीच असेल”, असे मत मराठी नाट्य कलाकार संघाचे उपाध्यक्ष शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.