मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि ठाकरे यांच्याशी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली.
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होत असल्याने राजकीय पक्षांसाठी ही पर्वणी असून त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कोरोना महामारीची दोन वर्षे वगळल्यानंतर यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत आहे. त्यामुळे भाविकांचा उत्साह दुणावला आहे. राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मदतही केली आहे. लोकप्रतिनिधींचे भव्य कटआऊट यंदा मोठ्या प्रमाणात उत्सवात दिसत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी गणेशोत्सव ही मोठी संधी असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या उत्सवात मोर्चेबांधणी करीत आहेत. यंदा या उत्सवावर राजकीय छाप पडल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्ष उत्सवानिमित्ताने मुंबई पिंजून काढणार आहेत.
गाठीभेटीना सुरुवात
मुंबईतील लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांच्या इच्छुकांसह इतर इच्छुक प्रयत्न करीत आहेत. गणेशोत्सवाची लगबग सुरू झाल्यापासून राजकीय पक्ष पक्षांचे इच्छूक उमेदवार आणि मंडळांचे पदाधिकारी यांच्या गाठीभेटी सुरू होत्या. आता गणेश मंडळांना गाठीभेटी देण्यास राजकारणी मंडळींनी सुरुवात केली आहे.
प्रचाराचा धुरळा उडणार
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीबरोबरच घरगुती मूर्तींच्या दर्शनाची राजकारणी संधी साधत आहेत. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मात्र त्या केव्हाही जाहीर होऊ शकतात, हे हेरूनच निवडणूक जाहीर होण्याआधीच राजकीय पक्षांचा प्रचाराचा धुरळा या उत्सवाच्या निमित्ताने उडणार आहे. मुख्य राजकीय पक्षांचा यात मोठा सहभाग आहे.
माजी नगरसेवक, आमदार यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या कामाचे अहवाल नागरिकांमध्ये वाटण्यास सुरुवात केली आहे. काहींनी श्रींची आळवणी करणाऱ्या पुस्तिका, माहितीपर पुस्तिका, हेल्पलाइन या माध्यमातून प्रचार आणि प्रसाराला सुरुवात केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात राजकीय व्यक्तींचा वावर वाढणार आहे.
राज्यात झालेल्या सत्तासंघर्षात शिवसेनेचे मोठे नुकसान झालेले दिसत आहे. त्यामुळे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेना या उत्सवात मोर्चेबांधणीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. भाजपा आणि शिंदे गटाचेही जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या उत्सवात सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. अटीतटीच्या होणाऱ्या पालिका निवडणुकीत मोर्चेबांधणी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत.
सव्वा लाख घरामध्ये प्रतिष्ठापना
गणेशोत्सव निर्बंधमुक्त झाल्यामुळे मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात मुंबईत गणरायाच्या मूर्तींचे आगमन झाले. मुंबई शहर आणि उपनगरात दहा हजाराहून अधिक मोठ्या मूर्तीं विराजमान झाल्या, तर सुमारे सव्वा लाखाहून अधिक लहान मूर्तींची धराघरांमध्ये प्रतिष्ठापना झाली आहे. मुंबईत घरोघरी मंगलमय आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राजकारणी मंडळी घरोघरी भेटीगाठींवरही जोर देणार हे निश्चित आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव भाविकांना प्रसन्न होणारच, पण राजकारण्यांना किती आणि कसा प्रसन्न होतो हे निवडणुकीतच कळेल.