-
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना भवन कुणाचं? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. हा वाद आता निवडणूक आयोगानंतर सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयासाठी शिंदे गटाकडून दादरमध्येच जागेचा शोध सुरु असल्याचं शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी सांगितलंय. याबाबत बोलताना मुंबईतील नागरिकांना सहजरित्या जाता येईल असं कार्यालय असेल. साधारण काही दिवसात कार्यालय सुरु करु, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं आहे.
आम्ही शिवसेनेतेच आहोत, आम्हीच खरी शिवसेना असं शिंदे गटातील नेते सांगतात. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे प्रति शिवसेना भवन तर उभारण्याच्या तयारीत तर नाहीत ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याबाबत विचारलं असतं नवं जुनं असा कुठलाही भाग नसेल. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील लोकप्रीय मुख्यमंत्री आहेत. राज्यभरातून लोक त्यांना भेटण्यासाठी येतात, त्यासाठी एखादं कार्यालय हवं. त्यामुळे दादरमध्येच एखादं कार्यालय हवं असा आमचा मानस आहे. कार्यालय निश्चित असेल तर त्यात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जातील. कार्यालयाचं नाव काय ठेवायचं ते नंतर ठरवलं जाईल. फक्त दादरच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे, असं सरवणकर यांनी सांगितलं.
कार्यालयात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख बसतील
शिवसेनेनं पदपथावर आपलं कार्यालय सुरु केलं होतं. तेव्हा पदपथावर बसून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जायचे. शिंदे यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख बसतील, अशी माहितीही सरवणकर यांनी दिलीय. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना सरवणकर म्हणाले की, प्रत्येक आमदारा मंत्री व्हावं असं वाटत असतं. आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यांना शपथ देणं गरजेचं होतं. आता शिंदेंना योग्य वाटेल त्याला ते मंत्रिपद देतील. तर खातेवाटपाबाबत अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो. लवकरच खातेवाटप जाहीर होईल, अशी माहितीही सरवणकर यांनी दिलीय.
‘प्रति शिवसेना भवन बांधाल पण त्यात देव असावा लागतो, तो पहिल्या शिवसेना भवनात’, जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ) यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावलाय. ‘प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे’, अशा शब्दात पाटील यांनी शिंदेंना टोला लगावलाय.
जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना भवनाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलीय. एकनाथ शिंदे यांची ताकद मोठी आहे. सुरत, गुवाहाटीला त्यांनी ताकद दाखवली आहे. त्यामुळे प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे. महाराष्ट्रात शिवसैनिक हे विसरणार नाही, असं पाटील म्हणाले.
‘..आता एकनाथ शिंदेंना कळलं असेल’
मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुनही पाटील यांनी शिंदे आणि फडणवीसांवर टीका केलीय. शिंदे आणि फडणवीस यांनी 40 दिवस मंत्रिमंडळात कुणाला घेतलं नाही. त्यानंतर लोकांमधून ओरड आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला. विस्तार होऊन तीन दिवस झाले आहेत. सकाळी शपथ घेतल्यानंतर संध्याकाळी खातेवाटप केले जाते अशी परंपरा आहे. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर खातेवाटप करणं किती कठीण आहे हे एकनाथ शिंदेंना आता कळलं असेल. आता त्यांना कदाचित आपलं नगरविकास खातंच बरं होतं असं वाटत असेल.