मुंबई : दहशतवादी विरोधी पथकाच्या (ATS) एका चुकीमुळे एका तरुणाला तब्बल दीड वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. ATS च्या दाव्यानुसार एक युवकाकडे अंमली पदार्थ (Drugs) सापडले होते. त्यात कोकीन हा अमली पदार्थ देखील होता. मात्र केमिकल ऍनलिसिसच्या अहवालानुसार जप्त केलेला अंमली पदार्थ हा कोकीन नव्हताच. ज्या गोळ्या नायजेरिया युवकाकडून जप्त करण्यात आल्या होत्या. त्या NDPS कायद्यांतर्गत येत नाहीत. ATS ने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात टायपिंगची चूक होती.
मुंबईमध्ये एका नायजेरियन युवकाकडे संशयित गोळ्या आणि पावडर आढल्याने त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अंमली पदार्थ विकण्याची केस चालवण्यात आली. मात्र एटीएसने दाखल केलेल्या अहवालातील चुकीमुळे त्याला दीड वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागल्याचं समोर आलं आहे.
आता मुंबई उच्च न्यायालयाने त्याला सोडण्याचा निर्णय देत त्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर ही केस सुरु होती. या युवकाला 12 ऑगस्टपर्यंत किती नुकसान भरपाई द्यावी हे महाराष्ट्र सरकारने ठरवावे अन्यथा त्याला किती नुकसान भरपाई द्यायची ती रक्कम न्यायालय ठरवेल अशा शब्दांमध्ये न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे.