मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग-३ साठी ८ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेनच्या डब्यांच्या जोडणीचे काम यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता या ट्रेनला बॅटरी-चलित शन्टरद्वारे जोडले गेले आहे. मुंबई मेट्रो ३ च्या या पहिल्या ट्रेनच्या ट्रायलला सुरुवात होत आहे.
पहिल्या ट्रेनची यशस्वीरीत्या चाचणी
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कार डेपोसाठी केलेल्या पहिल्या ट्रेनचे ८ डबे मुंबईत दाखल झाल्यानंतर या डब्यांना शन्टरने आरेतील सारीपूत नगर येथे ट्रेन डिलिव्हरी आणि चाचणी ट्रेकसाठी उभारलेल्या तात्पुरत्या सुविधेमध्ये या ट्रेनची जुळवणी करण्यात आली आहे. या छोट्या अद्भूत शन्टरची क्षमता ३५० टन वजन खेचण्याची आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज असताना हे शन्टर ८ डब्यांची ट्रेन ९ कि.मी.पर्यंत खेचू शकते. तसेच हे शन्टर सतत ५० किलो न्यूटन क्षमतेने काम करू शकते. या शन्टरची त्याच्या स्वयंचलित कप्लर तसेच अर्धस्थायी कप्लर अडॉप्टरसह यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली.
दोन्ही कप्लर मेट्रो डबे जोडण्यासाठी वापरले जातात. ठाणे येथील मे. रेनमॅक इंडिया प्रा.लि. यांनी नेदरलँड्सच्या एन.आय.टी.इ.क्यू. संस्थेसोबतच्या संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करारांतर्गत मेक-इन-इंडियाच्या धोरणाचा एक भाग म्हणून या रेल कम रोड शन्टरची पूर्णपणे निर्मिती केली आहे.