मुंबई,NHI/प्रतिनिधी : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे आरएमएमएस सहकार्याने क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाने सलामीची साखळी लढत जिंकली. सलामीवीर अमोल तोरस्कर व सुशांत गुरव यांच्या दमदार अर्धशतकामुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलने बलाढ्य जे.जे. हॉस्पिटलचा ७३ धावांनी पराभव केला. अष्टपैलू सुशांत गुरव व सुभाष शिवगण यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे माजी अध्यक्ष व क्रिकेटपटू नरेंद्र राणे, क्रीडाप्रेमी सोहेल सुभेदार, सत्कारमूर्ती क्रिकेटपटू डॉ. हर्षद जाधव व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.
शिवाजी पार्क मैदानात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलची सलामी जोडी जे.जे. हॉस्पिटलचा प्रमुख मध्यमगती गोलंदाज विलास जाधवने ४ धावसंख्येवर फोडली. परंतु त्यानंतर सलामीवीर अमोल तोरस्कर (३७ चेंडूत ५३ धावा), सुशांत गुरव (३२ चेंडूत ६१ धावा) व रोहित सोमार्डे (१८ चेंडूत २३ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करून सेव्हन हिल्स हॉस्पिटलला २० षटकात ४ बाद १७८ धावांचा डोंगर उभारून दिला. विजयी लक्ष्याच्या दबावामुळे जे.जे. हॉस्पिटलची फलंदाजी बहरली नाही. डॉ. मनोज यादव (६ धवन २ बळी), सुशांत गुरव (९ धावांत २ बळी), रितेश लोहट (१४ धावांत २ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करून जे.जे. हॉस्पिटलचा डाव मर्यादित २० षटकात ९ बाद १०५ धावांवर थोपविला. परिणामी सेव्हन हिल्स हॉस्पिटलने ७३ धावांनी शानदार विजय संपादन केला. जे.जे. हॉस्पिटलतर्फे सुभाष शिवगण ( २२ चेंडूत २४ धावा), सागर मारू (२३ चेंडूत १७ धावा), ओमकार शिवतरकर (१४ चेंडूत १६ धावा) यांनी छान फलंदाजी केली. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल क्रिकेटपटू नरेंद्र राणे यांचा रुग्णालयीन क्रिकेट संघांच्यावतीने आयडियल अकॅडमीतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
***************************************