आपण या प्रश्नाकडे आणि खास करून घाणेरडा या शब्दाकडे कशा दृष्टीने बघतो यावर ते अवलंबून आहे … माझ्या मते जगातील सर्वात घाणेरडा प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी आणि सर्वात सुंदर आणि चांगला प्राणी म्हणजेही मनुष्य प्राणीच आहे … कारण भोगयोनीत आयुष्य जगणाऱ्या अन्य योनींच्या तुलनेत कर्मयोनीत जगणाऱ्या मनुष्य प्राण्याला काही मर्यादेत तरी का होईना पण कर्माचे स्वातंत्र्य जास्त आहे.
- मनुष्येतर योनीतले प्राणी अन्य जीवांची हत्या करतात ज्याचा हेतू उदरभरण करणे हा असतो तर मनुष्यप्राण्याचा हिंसा करण्यामागील हेतू उदरभरण करण्याव्यतिरिक्त साहस किंवा छंद हासुद्धा असू शकतो. म्हणजे मनुष्य प्राण्यासाठी दुसऱ्या जीवाला वेदना देऊन ठार मारणे हा आनंद देणारा एक खेळ आहे.
- मनुष्येतर योनीतले प्राणी स्वतःचा आणि पिलांचे पोट भरले की भक्ष अर्ध्यावर सोडून निघून जातात … फारच थोडे प्राणी असे आहेत की जे अन्नाची साठवण करतात. पण मनुष्यप्राणी स्वतःचाच नव्हे तर पिलांचा, त्यांच्या पिलांचा आणि त्यांच्या पिलांची सोय करण्यासाठी संचय करत असताना अगदी दुसऱ्याच्या हक्काचे अन्नसुद्धा त्याच्या समोरून ओढून घेतात.
- मनुष्येतर योनीतले प्राणी स्वतःच्या जीवाचे आणि पिलांचे संरक्षण करण्यासाठी प्राणी आक्रमक होतात आणि भूक लागली नसली तरीही दुसऱ्या प्राण्यांवर हल्ला करतात. मनुष्यप्राणी मात्र अन्य मनुष्यप्राण्यांवर रुबाब झाडण्यासाठी किंवा दहशत निर्माण करून त्याच्यावर राज्य करण्याच्या हेतूने आक्रमक होत असतात.
- मनुष्येतर योनीतले प्राणीही डावपेच आखतात, चकवा तयार करून शिकार करतात … पण मनुष्य प्राण्यात श्रेष्ठत्व गाजवण्याची जी हौस आहे ती अन्य प्राण्यांत दिसत नाही. म्हणजे स्वतःचे श्रेष्टत्व सिद्ध करण्यासाठी मनुष्यप्राणी कोणत्याही थराला जाऊ शकतो … तो आत्महत्या करू शकतो, एखाद्याचा जीव घेऊ शकतो वा जगाचा नाशही करू शकतो.
- मनुष्यप्राण्याला बुद्धी आहे … तर्क आहे … भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींबाबत तो अपेक्षा करून त्या बाबत तो उपाययोजना करू शकतो … त्यासाठी वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करतो. आणि त्यासाठी मनुष्यावर प्रयोग करण्यापूर्वी तो बेडूक, गिनिपिग आणि माकड यांच्या सारख्या प्राण्यांवर प्रयोग करतो … ज्यात त्यांचा प्राणही जाऊ शकतो वा कायमस्वरूपी राहील असे अपंगत्व येऊ शकते … प्रयोग झाल्यावर मनुष्य त्या प्राण्यांना त्यांच्या अवस्थेवर सोडून देतो … प्राण्यांना बुद्धीच मर्यादित असल्यामुळे हा प्रश्नच येत नाही.
त्यामुळे मनुष्यप्राणी हा सर्वात घाणेरडा प्राणी आहे.