विमा उद्योगाच्या 17.9 टक्के जीडीपीआय वाढीच्या तुलनेत कंपनीच्या जीडीपीआयमध्ये 18.9 टक्क्यांनी वाढ
मुंबई, ता. 19 : जनरल इन्शुरन्स उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने 2024 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) चमकदार कामगिरी बजावताना करोत्तर नफ्यात 11.8 टक्के वाढ नोंदविली आहे. ढोबळ थेट प्रिमीयम संकलनातही कंपनीने आपली दैदिप्यमान कामगिरी कायम राखताना त्यात 18.9 टक्के वाढ राखत विमा उद्योगाच्या एकूण वाढीपेक्षा अधिक वाढ साध्य करुन दाखविली आहे.
कपनीचे ढोबळ थेट प्रिमीयम उत्पन्न (जीडीपीआय) हा घटक जनरल इन्शुरन्स कंपन्यासाठी महत्वाचा मापदंड मानला जातो. कंपनीचा जाडीपीआय 2023-24 या आर्थिक वर्षात 63 अब्ज 87 कोटी रुपयांवर पोहचला आहे. गतवर्षीच्या म्हणजेच 22-23 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा जीडीपीआय 53 अब्ज 70 कोटी रुपये होता. त्यातुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यात 18.9 टक्के वाढ झाली आहे. संपुर्ण विमा उद्योग क्षेत्रासाठी ही वाढ 17.9 टक्के होती. पीकविमा यातून वगळल्यास कंपनीचा जीडीपीआय हा 19.2 टक्के एवढा भरतो, जो उद्योगाच्या वाढीच्या 17.4 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.
पहिल्या तिमाहीसाठी संयुक्त गुणोत्तर 103.8 टक्के राहिलेले आहे. 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत संयुक्त गुणोत्तर 104.1 टक्के होते. चक्रीवादळाचा 0.35 अब्ज रुपयांचा परिणाम यातून वगळल्यास संयुक्त गुणोत्तर यंदाच्या पहिल्या तिमाहीसाठी 102.9 टक्के नोंदविले गेले आहे.
पहिल्या तिमाहीत करपुर्व नफा (पीबीटी) 11.8 टक्क्यांनी वाढून पाच अब्ज 20 कोटी रुपयांवर झेपावला आहे. गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीत पीबीटी चार अब्ज 65 कोटी रुपये होता. तर यंदाच्या पहिल्या तिमाहीत भांडवली नफा (कॅपिटल गेन्स) एक अब्ज 23 कोटी रुपये नोंदविला गेला असून गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीत तो केवळ 32 कोटी रुपये होता.
त्यामुळे करोत्तर नफा (पॅट) यंदाच्या पहिल्या तिमाहीत 11.8 टक्क्यांनी वाढून तीन अब्ज 90 कोटी रुपयांवर गेला आहे. गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीत तो तीन अब्ज 49 कोटी रुपये होता. तसेच सरासरी समभागांवरील परतावा (आरओएई) 2023 च्या पहिल्या तिमाहीतील 15 टक्क्यांच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत 14.7 टक्के मिळालेला आहे.
सॉलव्हन्सी गुणोत्तर मार्च 2023 अखेरच्या 2.51 पटीच्या तुलनेत 30 जून 2023 मध्ये 2.53 पट राहिले आहे. नियामकांच्या किमान दीड पट अटीच्या तुलनेत कंपनीने त्यापेक्षा अधिक राखले आहे.
वित्तीय वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीतील कामगिरीवर भाष्य करताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ भार्गव दासगुप्ता म्हणाले, पहिल्या तिमाहीमधील आमची भरभक्कम कामगिरी आमच्या सहकारी घटकांना मूल्य वितरीत करण्याबाबतची आमची अतूट बांधिलकी दर्शवते. बाजारात आव्हानात्मक परिस्थिती असूनही, आम्ही मजबूत वाढ साध्य करण्यात आणि नफा राखण्यात यशस्वी झालो आहोत. ही कामगिरी आमच्या व्यवसाय प्रारुपाची लवचिकता, आमच्या चमूची उद्दीष्टांसाठीची समर्पणवृत्ती आणि आमच्या ग्राहकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा दाखला आहे”