मुंबई/प्रतिनिधी/NHI
सुशांत गुरवचा (८ धावांत ९ बळी, नाबाद ३२ धावा) अष्टपैलू खेळ व डॉ. हर्षद जाधवची कप्तानपदास साजेशी कामगिरी यामुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलने रहेजा हॉस्पिटलचे आव्हान १० विकेटने सहज संपुष्टात आणले आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. कप्तान अविनाश डांगळे व विजय वैती यांनी सलामीला छान खेळ करूनही रहेजा हॉस्पिटल संघाला मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. अष्टपैलू सुशांत गुरव व अविनाश डांगळे यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन क्रिकेटपटू डॉ. हर्षद जाधव व क्रिकेटप्रेमी महेश शेटे यांनी गौरविले.
स्पर्धेतील अस्तित्वासाठी साखळी ब गटाची रहेजा हॉस्पिटल विरुध्द सेव्हन हिल्स हॉस्पिटल यामधील लढत चुरशीची होईल, हा अंदाज सुशांत गुरवच्या (८ धावांत ९ बळी) प्रभावी गोलंदाजीने फोल ठरविला. प्रथम फलंदाजी करतांना कप्तान अविनाश डांगळे (१५ चेंडूत १५ धावा) व विजय वैती (१३ चेंडूत १३ धावा) यांनी रहेजा हॉस्पिटलला सलामीला छान सुरुवात करून दिली. परंतु सुशांत गुरव व डॉ. हर्षद जाधव (२१ धावांत १ बळी) गोलंदाजांनी सलामी जोडीला तंबूत पाठविताच शिलकी सर्व फलंदाज सुशांत गुरवच्या गोलंदाजीचे शिकार झाले. परिणामी रहेजा हॉस्पिटलचा डाव ९ व्या षटका अखेरीस अवघ्या ५२ धावसंख्येवर संपुष्टात आला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना सलामीवीर अमोल तोरस्कर (१९ चेंडूत १६ धावा) व सुशांत गुरव (३१ चेंडूत ३२ धावा) यांनी ५३ धावांची अभेद्य सलामी देत सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला ८.२ षटकात सामना जिंकून दिला. ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल वि. सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल वि. ग्लोबल हॉस्पिटल अशा उपांत्य फेरीच्या दोन लढती १२ एप्रिल रोजी शिवाजी पार्क मैदानात होणार आहेत.