मुंबई : ओएनडीसी ने ईकॉमर्सवर १२ दशलक्ष मासिक व्यवहारांचा पल्ला पार केला आहे. या ओपन नेटवर्कने आता कर्ज देण्यास सुरुवात केली असून फक्त ६ मिनिटांत संपूर्ण डिजिटल, पेपरलेस कर्ज सुविधा सादर केली आहे. या नवी`न उपक्रमामध्ये ९ खरेदीदार अॅप्लिकेशन्स (ज्यांना कर्ज सेवा प्रदाता देखील म्हणतात) आणि ३ कर्जदाता आहेत. कर्ज सेवा क्षेत्रात पोहोच आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या ओएनडीसी नेटवर्कच्या मिशनमधला हा एक लक्षणीय टप्पा आहे.
पगारदार आणि स्व-रोजगार मिळवणाऱ्या व्यक्तींसाठीचे असुरक्षित कर्ज हे या डिजिटल कर्ज उपक्रमातील प्रारंभिक उत्पादन आहे. यातील खरेदीदार अॅप्लिकेशन्समध्ये ईझीपे, पैसाबझार, टाटा डिजिटल, इनव्हॉईसपे, क्लिनिक३६०, झ्यापार, इन्डीपे, टायरप्लेक्स आणि पेनीयरबाय यांचा समावेश आहे, तर कर्ज देणाऱ्यांत आदित्य बिर्ला फायनान्स, डीएमआय फायनान्स आणि कर्नाटक बँकेचा समावेश आहे.
केवळ ६मिनिटांत, कागदाचा वापर न करता, डिजिटल माध्यमातून कर्ज देण्यासाठी या संपूर्ण कर्ज प्रक्रियेत ४ डिजिटल पब्लिक गुड्सचा उपयोग केला जातो- डेटा साठी अकाऊंट अॅग्रीगेटर,केवायसीसाठी डिजीलॉकर / आधार, परतफेडीसाठी ईएनएसीएच / ईमॅण्डेट आणि कारारावरील सहीसाठी आधार ई-साईन. यामुळे, दूरस्थ आणि वंचित क्षेत्रांपर्यंत कर्ज सुविधा पोहोचू शकेल आणि भारतात डिजिटल कर्ज क्रांती घडून येईल.
*ओएनडीसीचे एमडी आणि सीईओ टी. कोशी* म्हणाले, “सदर घडामोड हे कर्ज उपलब्धतेचे लोकशाहीकरण करण्यातील मोठे पाऊल आहे. एकाच प्रक्रियेत विविध डिजिटल प्रणालींचा समावेश करून आम्ही कर्ज घेण्याचा अनुभव सुलभ करत आहोत आणि सुदूर आणि वंचित क्षेत्रात राहणाऱ्या लोकांपर्यंत कर्ज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या इनोव्हेशनमुळे कर्जदाता आणि बायर अॅप्लिकेशन्स या दोघांसाठी कार्यकारी खर्च तर कमी होईलच, पण देशभरात आर्थिक समावेशकता वाढेल, आर्थिक विकासाला गती मिळेल आणि संधी वाढतील. समावेशकतेच्या ओएनडीसी च्या व्हिजनला धरूनच हे इनोव्हेशन आहे आणि आता आर्थिक समवेशापर्यंत ते विस्तारित झाले आहे.
ही नवीन डिजिटल कर्ज प्रक्रिया सुलभतेने आणि झटपट कर्ज देऊन मोठा प्रभाव निर्माण करणार आहे. ओएनडीसी प्रोटोकॉलने प्रदान केलेल्या प्रमाणित चौकटीच्या आधारावर कर्जदाता आणि बायर अॅप्लिकेशन्स हे दोघेही अधिक कार्यक्षम होऊन आपली पोहोच वाढवू शकतील. विविध वितरण बिंदूंचा अॅक्सेस मिळवण्यासाठी कर्जदात्यांना फक्त ओएनडीसी प्रोटोकॉल अंगिकारावा लागेल. त्याचप्रमाणे, ओएनडीसी प्रोटोकॉलच्या मदतीने बायर अॅप्लिकेशन्सना केवळ एका इंटीग्रेशनने विविध कर्जदात्यांपर्यंतचा अॅक्सेस मिळेल.
या डिजिटल कर्ज मॉडेलचा विस्तार करण्यात स्वारस्य असलेल्या मोबीविक, रूपीबॉस आणि समृद्ध.एआय सारख्या अनेक खरेदीदार अॅप्लिकेशन्स आहेत तसेच एचडीएफसी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, फेअरसेंट, पहल फायनॅन्स, फाईब, टाटा कॅपिटल, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस फायनॅन्स, एफटी कॅश आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारखे कर्जदाते आहेत.
ओएनडीसी नेटवर्कची सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत जीएसटी इनव्हॉईस फायनॅन्सिंग कर्ज सुरू करण्याची योजना आहे. त्या पाठोपाठ येणाऱ्या उत्पादनांत व्यक्ती आणि सोल प्रॉपरायटर्ससाठी परचेस फायनॅन्सिंगचा तर भागीदारी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांसाठी वर्किंग कॅपिटल लाइन्सचा समावेश आहे.