मुंबई : रविवारी सुट्टीनिमित्त जर तुम्ही लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. रविवारी लोकलने प्रवास करणे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. कारण रविवारी रेल्वेच्या दोन मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी रविवारी हा मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डाच्या दिवा मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे
असा असेल मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. तर ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने लोकल धावतील.
असा असेल हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक –
पनवेल – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावतील. तर ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
असा असेल पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर वसई यार्ड ते दिवा अप डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 12.15 ते मध्य रात्री 3.15 वाजेपर्यंत हा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वसई यार्डातील काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे.