MUMBAI :
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय कॅरम संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये सिध्दी तोडणकर, जितेंद्र मिठबावकर, सुशांत गिरकर, मिलिंद मोरे, आशितोष भालसिंग, ऐश्वर्य मिश्रा आदींनी सलामीचे सामने जिंकले. महिला एकेरीत सिध्दी तोडणकरने सुरुवातीपासून राणीवर कब्जा मिळवीत सामन्यावर वर्चस्व राखले आणि सिध्दीने दिव्या दीक्षितचे आव्हान १०-२ असे संपुष्टात आणले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने परेल येथील आरएमएमएस सभागृहात सुरु झालेल्या चाचणी कॅरम स्पर्धेत एकूण ७६ खेळाडूंनी भाग घेतला आहे.
पुरुष एकेरीत जितेंद्र मिठबावकरने प्रथमपासून अचूक फटकेबाजी करीत इक्बाल खानविरुध्द पहिल्या दोन बोर्डात १२-० अशी मोठी आघाडी घेतली. परिणामी दडपणाखाली खेळतांना इक्बाल खानचे हातचे बोर्ड निसटले. अखेर जितेंद्र मिठबावकरने १८-० असा विजय मिळवीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सुशांत गिरकरने सहज जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत आशु चंद्रला २५-० असा नील गेम दिला आणि पहिली फेरी जिंकली. अन्य सामन्यात ऐश्वर्य मिश्राने अभय वैद्यला ६-४ असे, मिलिंद मोरेने रवी ओरायनला १४-० असे, आशितोष भालसिंगने विशाल चौखेला ११-० असे तर आशुतोष डोंगरेने अजय सिंगला १२-० असे हरवून प्रारंभीच्या लढतीमध्ये विजय संपादन केला. पहिल्या चार क्रमांकाचे विजेते कॅरमपटू, चेन्नई येथे २९ ऑगस्टपासून होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील आंतर विभागीय बीओबी कॅरम स्पर्धेमध्ये बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय पुरुष व महिला कॅरम संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.