बहीण – भावाचे प्रेमळ नाते अधोरेखित करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन. नात्यातील गोडवा अधिक वाढविण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने सुद्धा पुढाकार घेतला आहे. दरवर्षी पोस्टाद्वारे अनेक बहिणी आपल्या भावासाठी राख्या पाठवतात, म्हणूनच पोस्ट विभागाने विशेष खबरदारी घेत पावसात राखी भिजू नये याकरता पोस्टाने वॉटरप्रूफ पाकिटे तयार केली आहेत.
राखी पाठवण्यासाठी वॉटरप्रूफ लिफाफा
अनेकदा लांब राखी पाठवयाची असल्यास प्रवासात पाकिटे भिजतात परंतु यंदा पोस्टाने खास राखी पाकिटांची विक्री सुरू केली आहे. राखी लिफाफा हा पूर्णपणे जलरोधक(waterproof) असणार आहे. या लिफाफ्याच्या विक्रीसाठी पोस्ट विभागात स्वतंत्र काऊंटर तयार करण्यात आले आहेत.
या वॉटरप्रूफ लिफाफ्यांची किंमत १० रुपये आहे. यंदा ११ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे. या लिफाफ्याद्वारे देशात कुठेही स्पीड पोस्ट, रजिस्ट्री आणि सामान्य पोस्टाने तुम्ही राखी पाठवू शकता अशी माहिती देण्यात आली आहे.
बाजारपेठ बहरली
रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. यात कार्टून राखी, म्युझिक लाईटच्या राख्या सुद्धा बच्चेकंपनींसाठी उपलब्ध आहेत. बाजारात ५ ते १० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत राख्या तुम्ही खरेदी करू शकतात.