भारतातील सर्वात मोठे नेटवर्क अर्थाच जिओने (Jio) 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. जिओ १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी भारतात 5G सेवा लॉंच करणार आहे. यावर्षी आपल्या देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे.
5G सेवा सुरू करणार
जिओच्या 5G सेवेच्या घोषणेमुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार असून इंटरनेट स्पीड, कॉलिंग सुविधेत ग्राहकांना दर्जेदार अनुभव मिळेल. एअरटेलने सुद्धा अलिकडेच 5G सेवा सुरू करण्याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे जिओने सुद्धा 5G सुविधा अमलात आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. संपूर्ण भारत 5G रोलआउटसह ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करेल अशी माहिती रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी दिली आहे.
जिओची सर्वाधिक बोली
5G स्पेक्ट्रम लिलावात एकूण चार दूरसंचार कंपन्यांनी 1,50,173 कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. ज्यामध्ये एकट्या रिलायन्स जिओचा वाटा ५९ टक्क्यांच्या जवळपास आहे. रिलायन्स जिओने 88,078 कोटी रुपयांच्या 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. Jio ने एकूण 24,740 MHz स्पेक्ट्रम विकत घेतले आहे.
भारतात 5-जी तंत्रज्ञानाची सुरुवात झाल्यानंतर दहा पटीने इंटरनेटचा स्पीड जास्त वाढेल. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्या लोकांचे आयुष्य बदलून जाईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 5-जी चा स्पीड हा 4-जीच्या तुलनेत 10 पटीने जास्त असेल. देशात 5-जी तंत्रज्ञानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक रोजगार उपलब्ध होतील. 5-जी आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 5-जी तंत्रज्ञानामुळे हेल्थकेअर, व्हर्चुअल रियालिटी, क्लाउड गेमिंग यासाठी नवे मार्ग खुले होतील.