NHI NEWS AGENCY
मुंबई, : कळवा येथील सहकार विद्या प्रसारक मंडळ माध्यमिक विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी ‘ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज २०२४’च्या क्लस्टर फेरीत विजय मिळवला आहे. या स्पर्धेचे आयोजन ब्रिलिओ या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस व सोल्यूशन्स पुरविणाऱ्या कंपनीने केले होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेनेही या आयोजनात भाग घेतला.
आयडीयूबीएस, भांडुप येथे झालेल्या क्लस्टर फेरीनंतर या विद्यार्थ्यांचे यश साजरे करण्यात आले. स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) या विषयांमधील विविध उपक्रम यापुढे वर्भभर घेतले जाणार आहेत. त्यांची सुरुवात या स्पर्धेच्या निमित्ताने झाली. यामध्ये विज्ञान आणि गणित मॉडेल स्पर्धा, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांची तोंडओळख यांचा समावेश होता. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, नावीन्य आणि डिझाइन विचारविषयक कौशल्ये वाढवण्याच्या दृष्टीने ही नॅशनल स्टेम चॅलेंज डिझाइन केलेली आहे. विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी ते या स्पर्धेसाठी पात्र असतात.
संपूर्ण भारतातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना एक उत्कृष्ट असा स्टेम शिक्षणाचा मंच प्रदान करणारी ‘ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज’ ही एक विशिष्ट राष्ट्रीय स्पर्धा आहे. युवकांमध्ये स्टेमविषयक कौशल्ये रुजविण्यास ब्रिलिओ कटिबद्ध आहे. ही स्पर्धा त्याचाच एक भाग आहे.
‘स्टेम लर्निंग’चे संस्थापक आशुतोष पंडित म्हणाले, “नॅशनल स्टेम चॅलेंजच्या चौथ्या आवृत्तीच्या आयोजनाबद्दल मी रोमांचित आहे आणि या यशस्वी विद्यार्थ्यांना विभागीय फेरीसाठी पुढे जाताना पाहून तितकाच उत्साही झालो आहे. ‘के-ट्वेल्व्ह’ शिक्षण सक्षम बनवण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यास स्टेम लर्निंग समर्पित आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण व्यक्त होण्यास संधी देतो. आमची विज्ञान केंद्रे जिथे स्थापित आहेत, तिथे हे उपक्रम आम्ही राबवितो.”
स्टेम लर्निंग ही भारतभर स्टेमचे शिक्षणाचा प्रसार करण्यास समर्पित असलेली एक अग्रणी संस्था आहे. देशभरातील ३८०० हून अधिक शाळांमध्ये ती काम करते. तसेच, सुमारे २५० हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कॉर्पोरेट सीएसआर उपक्रमांच्या सहभागातून ‘स्टेम लर्निंग’ने सरकारी शाळांमध्ये विज्ञान केंद्रे, विज्ञान प्रयोगशाळा आणि टिंकर लॅब स्थापन केल्या आहेत. अशा प्रकारे दहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून, भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि नवोन्मेषकांच्या पुढच्या पिढीला सक्षम बनवण्यासाठी स्टेम लर्निंग योगदान देत आहे.