Mumbai/NHI/ News Agency
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपदासाठी १२२ खेळाडूंमध्ये चुरस असेल. ११ ऑगस्ट रोजी आरएमएमएस सभागृह, परेल, मुंबई-१२ येथे रंगणाऱ्या स्पर्धेला आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना यांचे सहकार्य लाभले आहे. स्विस लीग पध्दतीने खेळविण्यात येणाऱ्या स्पर्धेचा प्रारंभ माजी क्रीडापटू गोविंदराव मोहिते, मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी ९.०० वा. होईल.
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग सौजन्याचे आकर्षक पुरस्कार जिंकण्यासाठी मलक दवे, दीप फुणगे, मंश टंक, शनाया जैन, यश चुरी, ईशान भोसले, आदित्य पालकर, धृवी पाटील, मल्हार कोटे, राजवीर दाते, हितांश शर्मा, आद्या भट, दिव्यम जैन, तश्वी जोशी आदी विशेष डावपेच रचण्याच्या तयारीत आहेत. किमान चार साखळी फेऱ्यांमधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची असल्यामुळे सबज्युनियर खेळाडूंच्या जलद रणनीतीचा कस लागेल. ६ ते १४ वर्षाखालील ८ वयोगटांतील पहिल्या १० मुलांना व पहिल्या ५ मुलींना बीओबी कपचा पुरस्कार आहे. तसेच सर्व सामने जिंकणाऱ्या लहान वयोगटातील विजेत्यास क्रीडाप्रेमी सुरेश आचरेकर स्मृती विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत.