मुंबई: गेल्या काही दिवसांपासून असंख्य चढउतार अनुभवलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आता आणखी एक नवा ट्विस्ट येताना दिसत आहे. कारण कालपर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या शिवसेना आणि शिंदे गटात नवीच समीकरणे आकाराला येताना दिसत आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेत यांनी अचानक सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील खोट्या आरोपांचा मुद्दा उपस्थित केला. अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेते नारायण राणे यांच्याकडून गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. मात्र, हे आरोप पूर्णपण खोटे होते, असे सांगत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांचा बचाव केला. यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बोलणीही झाली होती, असा गौप्यस्फोटही केसरकर यांनी केला. त्याचवेळी दीपक केसरकर यांनी आदित्य यांचा बचाव केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे तोंडघशी पडले आहेत.
दीपक केसरकर यांनी याविषयी बोलताना सांगितले की,सुशांत सिंह प्रकरणात झालेल्या आरोपांमध्ये आणि वस्तुस्थितीत जमीन आस्मानाचा फरक होता. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात आली. त्यामध्ये नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदांचा हात होता. त्यांनी भाजपच्या मुख्यालयातून पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. नारायण राणे यांच्या या आरोपांनंतर उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे माझ्यासारखे शिवसेनेतील अनेक आमदार आणि नेते दुखावले गेले होते. मी याबाबत भाजपच्या नेत्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनीही आमच्यातील बहुतांश आमदारांना नारायण राणे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर केले जाणारे आरोप पसंत नसल्याचे, असे मला सांगण्यात आले होते. त्यानंतर मी माझ्या वैयक्तिक संपर्कातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेलो.
मी हा सगळा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातला. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी माझे म्हणणे नीट ऐकून घेतले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात डायलॉग सुरु झाला होता. हे दोन्ही मोठे नेते आहेत. आम्ही या दोघांचे म्हणणे व्यवस्थितपर्यंत एकमेकांपर्यंत पोहोचवत होतो. या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधान मोदी यांनी एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे भूमिका निभावली. त्यांच्याकडून येणाऱ्या संदेशांमधून ती बाब प्रतित होत होती. यामध्ये पंतप्रधान मोदींना बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी असणारा आदरही दिसून येत होता, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.