mumbai : NHI NEWS
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने कबड्डी दिन-१५ जुलै रोजी शालेय संघांची कबड्डीप्रेमी आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. डॉकयार्ड येथील रोझरी हायस्कूल सभागृहात मॅटवर ही स्पर्धा टायब्रेकरसाठी होणाऱ्या ५-५ चढायांची रंगणार आहे. प्रायोगिक स्वरूपातील इंडोर कबड्डी स्पर्धेमधील पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार असून विजेत्या पहिल्या दोन संघांना आत्माराम मोरे शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेत थेट प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी दिली.
कबड्डी दिनाचे औचित्य साधून आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शालेय कबड्डीपटूना पावसाळ्यात देखील कबड्डीचा स्पर्धात्मक सराव मिळण्याच्या उद्देशाने गतवर्षाप्रमाणे यंदाही पूर्णपणे मोफत उपक्रम आयोजित केला आहे. परिणामी या हंगामात होणाऱ्या डीएसओसह मुख्य कबड्डी स्पर्धांच्या सरावासाठी शालेय संघांना त्याचा लाभ घेता येईल. तसेच क्रीडा शिक्षकांच्या आग्रहामुळे शालेय कबड्डीपटूचा खेळ अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, शिक्षक मोझेस लोपेस व राम गुडमे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व सुनील खोपकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवरांचे मोफत मार्गदर्शन देखील लाभणार आहे.
सदर उपक्रमासाठी संघटन समिती प्रमुख अश्विनीकुमार मोरे, रोझरी हायस्कूलचे फादर नाईजील बॅरेट व प्रिन्सिपल सिस्टर विजया चलील, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते आदी मंडळींचे सहकार्य लाभले आहे. सदर मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी सहसचिव ओमकार चव्हाण अथवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे ११ जुलैपर्यंत संपर्क साधावा.
**********************