मुंबई, ५ ऑगस्ट २०२२: देशातील लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीआय अर्थात ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने जून तिमाहीत करोत्तर नफ्यात वार्षिक ५८.४ टक्के वाढ नोंदवत ७७ कोटी रुपये करोत्तर नफा मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने ४८ कोटी रुपये नफा मिळवला होता. कंपनीने ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल मंगळवारी जाहीर केले. त्यात ही माहिती देण्यात आली.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल २०२२-जून २०२२) कंपनीचा निव्वळ महसूल गेल्या वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत ३२.२ टक्क्यांनी वाढून ८०७ कोटी रुपये झाला आहे. तर कंपनीचा निव्वळ ईबीटा(व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई वजा न करता मिळालेला महसूल ) ११५ कोटी रुपये असून मागील वर्षीच्या याच कालावधीत तो ८२ कोटी रुपये होता. निव्वळ ईबीटा मार्जिन गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.३ टक्के झाले आहे. जून तिमाहीत निव्वळ करोत्तर नफा मार्जिन मागील वर्षीच्या याच कालावधीतील ७.९ टक्क्यांवरून वाढून ९.५ टक्के झाले आहे.
या जून तिमाहीत एकूण नफा मागील वर्षीच्या याच कालावधीतील ४७ कोटी रुपयांवरून ६५.९ टक्क्यांनी वाढून ७९ कोटी रुपये झाला. तर एकूण करोत्तर नफा मार्जिन मागील वर्षीच्या याच कालावधीतील ६.८ टक्क्यांवरून वाढून ८.७ टक्के झाले आहे. एकूण ईबीटा मार्जिन गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या १२ टक्क्यांवरून वाढून १३.२ टक्के झाले आहे. एकूण ईबीटा महसूल गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ८३ कोटी रुपयांवरून ११९ कोटी रुपये झाला आहे. तर ऑपरेशन्स महसूल वार्षिक २९.७ टक्क्यांनी वाढून ९०३ कोटी रुपये झाला आहे.
टीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक विनीत अग्रवाल म्हणाले, “ग्राहकांना त्यांच्या पैशाचे योग्य मूल्य देण्यासाठी कंपनीसमोर उच्च इंधनाच्या किमतींचा परिणाम, सामान्य महागाई आणि काही क्षेत्रातील अस्थिर मागणी ही प्रमुख आव्हाने होती, मात्र व्यवसायाच्या मूलभूत तत्त्वांचे पालन केल्यामुळे चांगली कामगिरी करणे शक्य झाले. मल्टिमॉडल नेटवर्कद्वारे अखंड सागरी किनारी सेवा आणि रेल्वे रसद पुरवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यासोबतच कार्बन उत्सर्जन कमी करणे शक्य झाले आहे. कंपनीच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेऊन भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रथमच सुरू केलेल्या नॅशनल लॉजिस्टिक एक्सलन्स अवॉर्ड्समध्ये बेस्ट वेअरहाऊस सर्व्हिस प्रोव्हायडर आणि सर्वोत्तम कोल्ड चेन/रेफ्रिजरेटेड सर्व्हिस प्रोव्हायडरच्या श्रेणीत प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळाल्याने लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी अशी ओळख अधिक पक्की झाली आहे.”