मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील डॉक्टरांचे यश – अखेर 17 वर्षांपासूनचा संघर्ष संपला
मुंबई: भाईंदर येथे राहणाऱ्या एका ३७ वर्षीय व्यक्तीच्या शरीरातून 8.5 किलो वजनाचा (3 फूट x 1 ½ फूट, 90 सेमी आकार) प्लीहा शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढण्यात आली. डॉ. इम्रान शेख(सल्लागार जीआय आणि एचपीबी सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड) यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. रुग्णाला ओटीपोटात जडपणा, वेदना आणि थकवा जाणवणे अशा लक्षणांपासून अखेर आराम मिळाला असून आता रुग्णाने दैनंदिन कामांना सुरुवात केली आहे.
प्लीहा किंवा पाणथरी (स्प्लीन) ही पोटाच्या वरच्या बाजूला, डावीकडे, छातीच्या पिंजऱ्याच्या अगदी खाली असणारी, डाव्या बाजूच्या ९व्या, १०व्या आणि ११व्या बरगड्यांनी वेढलेली प्लीहा म्हणजे एक नारिंगीच्या आकाराचा अवयव असतो. जंतूसंसर्ग, यकृताचे आजार आणि काही कर्करोगांमध्ये प्लीहा आकाराने वाढते. हायपरस्प्लेनिझम हा एक दुर्मिळ विकार आहे जो प्लीहाच्या प्रचंड आकारामुळे आणि त्याच्या अति-कार्यामुळे रुग्णाला धोका निर्माण करतो. वाढलेल्या प्लीहामुळे रक्तपेशी अकालीच नष्ट होतात ज्यामुळे हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशी (WBC) आणि प्लेटलेटची संख्या कमी होते. कमी हिमोग्लोबिनमुळे रुग्णाला तीव्र कमकुवतपणा होता, पांढऱ्या पेशींची संख्या कमी असलेल्या रुग्णांना संक्रमण होण्याची शक्यता अधिक असते. प्लेटलेट संख्या खूपच कमी असलेल्या रुग्णाला रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.
17 वर्षांपूर्वी जेव्हा रुग्ण राजकुमार तिवारी हा 18 वर्षांचा होता तेव्हा त्याला ओटीपोटातील वरच्या भागात डाव्या बाजूस वेदना होत असल्याने त्याच्या दैनंदिन कामात अडचणी येऊ लागल्या. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनगी फारसा फरक पडला नाही. प्लीहा वाढल्याने त्याची तब्येत ढासळत राहिली, ज्यामुळे पोटात जडपणा, ओटीपोटात आणि आतड्यांमध्ये जागा नसल्यामुळे अडथळा निर्माण होणे, उलट्या होणे आणि अगदी हायपरस्प्लेनिझम यांसारखी दुर्मीळ लक्षणे दिसू लागली. त्यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत जाऊ लागली आणि एक वर्षाहून अधिक काळ त्यांना दैनंदिन कामे करता आली नाहीत. रुग्णाला त्याच्या फॅमिली डॉक्टरांनी वेळीच उपचार करण्यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर स्प्लेनोमेगालीचे निदान झाले.
डॉ. इम्रान शेख(सल्लागार जीआय आणि एचपीबी सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड) सांगतात की, रुग्णालयात आल्यावर रुग्ण अशक्त, थकलेला आणि कावीळ झालेला दिसत होता. त्याला एक वर्षाहून अधिक काळ या लक्षणांचा त्रास जाणवत होता पण गेल्या महिन्यात त्याची तीव्रता वाढली. क्लिनिकल तपासणीनंतर अचूक निदानासाठी रुग्णाची रक्त तपासणी आणि सीटी स्कॅन करण्यात आले.
वाढलेली प्लीहा (स्प्लेनोमेगाली) ही एक सामान्य घटना आहे जी तुमच्या रक्तप्रवाहातील निरोगी लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि पांढऱ्या पेशींची संख्या कमी करते, ज्यामुळे वारंवार संक्रमण होते. जेव्हा प्लीहाचा आकार 20 सेमी पेक्षा मोठा आणि 1 किलोपेक्षा जास्त वजनाचा असतो तेव्हा त्यास स्प्लेनोमेगाली म्हणतात. रुग्णाला एका वर्षाहून अधिक काळ हायपरस्प्लेनिझमचा त्रास होता. परिणामी त्याचे हिमोग्लोबिन, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेटची संख्या ही अतिक्रियाशील प्लीहामुळे खूपच कमी झाली. सुरुवातीला हिमोग्लोबिन 7g/dL, प्लेटलेट संख्या 40000 आणि पांढऱ्या रक्तपेशी 4000 इतके असायचे. अलीकडे, शस्त्रक्रियेपूर्वी हिमोग्लोबिन 5 mg%, प्लेटलेट संख्या 1000, पांढऱ्या रक्तपेशी 1200, आणि प्लीहा पोटात जागा न ठेवता वाढवत राहते. रुग्णाला चालता येत नव्हते, बसता येत नव्हते किंवा उभे देखील राहता येत नव्हते तो थकलेला आणि अंथरुणाला खिळलेला होता आणि तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून होता. त्याच्यावर योग्य वेळी उपचार न करणे धोकादायक ठरले असते ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता होती.
डॉ इमरान पुढे सांगतात की, या रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तयार करणे हे खूप आव्हानात्मक होते. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला दिलेले रक्त आणि रक्त उत्पादने प्लीहामध्ये ताबडतोब मृत पावतात (रीफ्रॅक्टरी हायपरस्पलेनिझम नावाची स्थिती). अत्यंत कमी प्लेटलेट संख्या असलेली शस्त्रक्रिया जीवघेण्या रक्तस्रावासह अत्यंत धोकादायक असते. रुग्णाची ओटीपोटाची अँजिओग्राफी करण्यात आली. पोस्ट-कॉइलिंग एम्बोलायझेशन शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि रुग्णाच्या सुरक्षिततेकरिता रक्त उत्पादने दिली जातात.
दुसऱ्या दिवशी ओटीपोटाची ओपन सर्जरी करण्यात आली. प्लीहेचा आकार मोठा होता आणि तो आतडे, स्वादुपिंड, डायाफ्राम आणि पोटाला चिकटलेला होता. या सर्व रचनांपासून प्लीहेला वेगळे करण्यात आले. शस्त्रक्रिया करुन 3 फूट x 1 ½ फूट, 90 सेमी आकाराचे 8.5 किलो वजनाची प्लीहा काढण्यात आली. यामध्ये कोणतीही इंट्राऑपरेटिव्ह किंवा पोस्टऑपरेटिव्ह गुंतागुंत झाली नव्हती. ही शस्त्रक्रिया सुमारे 6 तास चालली. यामध्ये जगातील सर्वात मोठी प्लीहा काढण्यात आली. 73.66 सेमी आणि 2.3 किलो वजनाची प्लीहा असल्याचा यापुर्वी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. या रुग्णाची प्लीहा 90 सेमी आकाराची आणि वजन 8.5 किलो आहे. रुग्ण आता बरा झाला असून आणि ऑपरेशननंतरच्या 5 व्या दिवशी त्याला घरी सोडण्यात आले. यावेळी त्याचे हिमोग्लोबिन 9.6, प्लेटलेट संख्या 8,00,000 आणि पांढऱ्या रक्तपेशींची संख्या 12000 (सामान्य) इतकी होती.
विविध विभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील समन्वयामुळे रुग्णास यशस्वी उपचार मिळाले. या दृष्टिकोनाने वोक्हार्ट हॉस्पिटल्स मीरा रोडला विशेष वैद्यकीय सेवा शोधणाऱ्यांसाठी एक विश्वासार्ह ठिकाण म्हणून ओळखले जात असल्याची प्रतिक्रिया डॉ. पंकज धमिजा(केंद्र प्रमुख, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड) यांनी व्यक्त केली.
वाढलेल्या प्लीहाचा 17 वर्षांचा संघर्ष अखेर संपला आहे . सतत वेदना आणि अस्वस्थता जाणवल्याने मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता. डॉ. इम्रान शेख आणि त्यांच्या टीममुळे मला नवे आयुष्य मिळाले अशी प्रतिक्रिया रुग्ण राजकुमार तिवारी यांनी व्यक्त केली.