Mumbai -NHI NEWS AGENCY:आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित अमृत महोत्सवी गोविंदराव माहिते चषक १९ वर्षाखालील मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत डीपीवायए हायस्कूलचा राष्ट्रीय दर्जाचा ज्युनियर कॅरमपटू कौस्तुभ जागुष्टे व एल.एन कॉलेजचा मिहीर शेख तसेच पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूलचा धुव भालेराव आदींनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. राष्ट्रीय दर्जाचे ज्युनियर कॅरमपटू पोद्दार कॉलेजची रुची माचीवले व मराठा हायस्कूलची सिमरन शिंदे, तसेच रत्नागिरीची स्वरा मोहिरे यांना निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. गौरवमूर्ती गोविंदराव मोहिते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन स्पर्धेला प्रारंभ केला.
मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील ४८ खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये सुरु आहेत. तिसऱ्या फेरीत सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत कौस्तुभ जागुष्टेने माजी विजेत्या समीर खानचे आव्हान १७-३ असे तर मिहीर शेखने नेहाल उस्मानीचे आव्हान १४-४ असे संपुष्टात आणले. प्रारंभ छान करूनही पृथ्वी बडेकरला ध्रुव भालेरावने १२-७ असे नमविले. अन्य सामन्यात सार्थक केरकरने रुची माचीवलेचा १५-१० असा, भव्या सोळंकीने अथर्व म्हात्रेचा १६-६ असा, बलाढ्य सिमरन शिंदेला हरविणाऱ्या मयुरेश पवारने अमेय जंगमचा २३-० असा, प्रसन्ना गोळेने निधी सावंतचा १७-१० असा तर जोनाथन बोनालने तन्वी परबचा २०-० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पंचाचे कामकाज सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर व अविनाश महाडिक आदी करीत आहेत. विजेत्या-उपविजेत्यांना स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते शनिवारी गौरविण्यात येणार आहे.
******************************