(लीलाधर चव्हाण)
यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे कामगार-क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते यांना शिवाजी पार्क मैदानात सत्तरीच्या इंटर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे १ जून २०१८ रोजी उद्घाटन करताना प्रकृती अस्वास्थामुळे फारच दमछाक झाली. परंतु त्यांच्या मागे उभी असलेली कामगार व क्रीडा चाहत्यांची मजबूत फळी गोविंदराव मोहिते यांना सेंच्युरीसाठी खुणवू लागताच नव्या जोमाने कामगार लढे देण्यासाठी स्फूर्ती देऊ लागली.
कामगारांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी कामगार नेते व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांचा लाभलेल्या भरभक्कम आधार यामुळे गोविंदराव मोहिते यांना ७५ व्या वर्षी पदार्पण करण्याची ऊभारी लाभली. कामगारांना घरे मिळवून देण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देण्याची गोविंदराव मोहिते यांची निष्ठा त्यांना प्रतिकूल परिस्थितीत देखील लढण्याचे एक वेगळेच अस्त्र देत आहे. म्हणूनच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतांना कामगारांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी अहोरात्र झटण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
प्रतिकुल परिस्थितीमुळे कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून सन १९६७ पासून खटाव मिलमध्ये नोकरी करतांना गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नाप्रसंगी त्यांच्या सुखदुखात गोविंदराव मोहिते समरस झाले. कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन आपल्या देशाचे आदरणीय लोकनेते शरद पवारसाहेब व युवानेते सचिनभाऊ अहिर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कामगार संघटकांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा गोविंदराव मोहिते यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या जडणघडणीत कामगार चळवळीद्वारे उदयास आलेले गोविंदराव मोहिते यांनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून आरएमएमएसचा खंदा कार्यकर्ता म्हणून विविध पदांच्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्यामुळे आता ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सरचिटणीसपदी विराजमान झाले आहेत.
गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील अग्रगण्य राष्ट्रीय मिल मजदूर कामगार संघाच्या सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते हे कामगार नेते आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे कार्यरत असून कामगार चळवळीतील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देत आहेत. गिरणी कामगारांच्या लढ्यात आझाद मैदानामध्ये प्राणांतिक उपोषण करीत त्यांनी गिरणी कामगारांचे घरांसह अनेक प्रश्न धसास लावण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळे कामगार चळवळीत आपल्या हक्काचा कामगार पुढारी म्हणून गोविंदराव मोहिते लोकप्रिय आहेत. म्हणूनच गेली पाच दशके राज्यातील कामगार व क्रीडा चळवळीतील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार गोविंदराव मोहिते यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामधील त्यांना पुण्यात लाभलेला ‘कामगार चळवळीचे जनक स्व. नारायण मेघाजी लोखंडे स्मृती कामगार भूषण पुरस्कार’ तसेच मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात नामवंत क्रिकेटपटूनी गौरविलेला ‘आयडियल जीवन गौरव पुरस्कार’ विशेष होते. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय पातळीवरील इंटक महाराष्ट्र कामगार संघटनेची विविध महत्वाची पदे भूषवित ते संघटीत व असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात विशेष कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेकदा कामगाराचे प्रतिनिधित्व केले आहे.
कामगार चळवळी सोबत त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ग्राहक संघ, सहकारी पतपेढी, शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र, कला संस्था, विविध क्रीडा संस्था आदी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गेली पाच दशके केलेले समाजोपयोगी कार्य अभिमानास्पद आहे. सन २०१५ मध्ये त्यांनी मुंबईच्या गोविंदाचे प्रात्यक्षिक अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पथकाची प्रमुख जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. पहिल्या मुंबई शेरीफ आंतरराष्ट्रीय गुणांकित फिडे बुध्दिबळ स्पर्धेत त्यांचा सुवर्ण पुरस्कार देऊन झालेला गौरव, आयडियल क्रीडा संघटक पुरस्कार तसेच महात्मा गांधी जयंती निमित्त व्यसनमुक्ती चळवळीच्या दरबारात झालेला गौरव गोविंदरावांच्या सामाजिक कार्याची पोचपावती देणारा ठरला. विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा संस्था प्रतिवर्षी त्यांचा आवर्जून गौरव करीत असतात. आपल्या समाजातील पदाधिकाऱ्यांना नेहमीच सक्रीय मदत करतांना इतर समाजालादेखील मदतीचा हात दिला. विविध कार्यासाठी सदैव सक्रीय गोविंदराव मोहिते हे अष्टपैलू व्यक्तिमत्व तरुण पिढीस प्रेरणादायी आहे.
म्हणूनच १ ते ८ जून २०२४ दरम्यान त्यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणातील सप्ताहात राष्ट्रीय मिल मजदूर संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत कामगार व त्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साकारीत असलेल्या वैध्यकीय, विमा, चर्चात्मक सत्र, आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा, युवा कॅरम स्पर्धा, व्यायाम विषयक विविध स्पर्धा, शालेय बुद्दीबळ स्पर्धा आदी उपक्रम लोकाभिमुख व प्रशंसनीय आहेत. यानिमित्त राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे अध्यक्ष व आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते कामगार दरबारात होत असलेला त्यांचा अमृत महोत्सवी गौरव शतकी वाटचाल करण्यास प्रेरक असेल. आरएमएमएस, आयडियल व डावपेच परिवारातर्फे आम्ही त्यांना उत्तम निरोगी व भरभराटीचे उदंड आयुष्य लाभो, ही श्री चरणी प्रार्थना !
******************************