डॉ. हेगडे टी-२० क्रिकेट स्पर्धेत सेव्हन हिल्स हॉस्पिटल अंतिम फेरीत
Mumbai: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे चषक आंतर हॉस्पिटल ‘बी’ डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत सेव्हन हिल्स हॉस्पिटलने प्रवेश केला. सुशांत गुरवच्या (नाबाद ३० धावा व ३ बळी) अष्टपैलू खेळामुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलने बलाढ्य ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा ५ विकेटने पराभव केला. अष्टपैलू सुशांत गुरव व सुदेश यादव यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने गौरवमूर्ती डॉ. मनोज यादव, डॉ. हर्षद जाधव, चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.
सेव्हन हिल्स हॉस्पिटल विरुध्द नाणेफेकीचा कौल जिंकून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय शिवाजी पार्क मैदानात लाभदायक ठरला नाही. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर मध्यमगती गोलंदाज विशाल सावंतने (११ धावांत २ बळी) धावांचे खाते उघडण्यापूर्वीच भरवंशाचा प्रमुख फलंदाज प्रदीप क्षीरसागरला तंबूत पाठविले. सुशांत गुरव (१३ धावांत ३ बळी), स्वप्नील शिंदे (२२ धावांत ३ बळी), डॉ. हर्षद जाधव (१० धावांत १ बळी), डॉ. मनोज यादव (१ धावांत १ बळी) यांच्या अचूक माऱ्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा डाव १४ षटकात ७२ धावसंख्येवर गडगडला. रोहन महाडिकने (२० चेंडूत १९ धावा) छान फलंदाजी केली.
विजयी लक्ष्य आटोक्यात असतांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलची सुरुवात निराशाजनक झाली. सुदेश यादव (१६ धावांत २ बळी), प्रथम कदम (१४ धावांत २ बळी), कप्तान प्रदीप क्षीरसागर (१५ धावांत १ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे पहिले ३ प्रमुख फलंदाज अवघ्या १० धावांत तंबूत परतले. परंतु सुशांत गुरव (२७ चेंडूत नाबाद ३० धावा) व डॉ. इब्राहीम शेख (२१ चेंडूत २२ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी करून सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला १२.३ षटकात ५ बाद ७५ अशी विजयी धावसंख्या रचून दिली. सेव्हन हिल्स हॉस्पिटलची हिरानंदानी हॉस्पिटल विरुध्द अंतिम लढत लायन्स गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ५ जूनला होईल.
******************************