MUMBAI -NHI NEWS AGENCY
अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर हॉस्पिटल ‘ए’ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद नानावटी हॉस्पिटल संघाने जिंकले. अंतिम फेरीत नानावटी हॉस्पिटल संघाने अंधेरीच्या बलाढ्य कोकिळाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटल संघाचा २५ धावांनी पराभव केला. आरएमएमएस व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये ओंकार जाधवने सर्वोत्तम अष्टपैलूचा, प्रथमेश महाडिकने उत्कृष्ट फलंदाजीचा तर मानस पाटील व प्रतिक पाताडेने उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार पटकाविला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, मुंबई क्रिकेट संघटनेचे अपेक्स कौन्सिल मेंबर अभय हडप, क्रीडाप्रेमी राजन लाड, सादिक खान, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कप्तान प्रदीप क्षीरसागर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
शिवाजी पार्क मैदानात नानावटी हॉस्पिटलने केडीए हॉस्पिटल विरुध्द नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मोठी धावसंख्या रचून प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणण्याचे डावपेच नानावटी हॉस्पिटलचे कप्तान ओंकार जाधवने (५६ चेंडूत ६८ धावा) सलामीला अर्धशतक ठोकून यशस्वी केले. ओंकार जाधवला दिनेश पवार (२५ चेंडूत ३८ धावा) व किशोर कुयेस्कर (१५ चेंडूत २१ धावा) यांनी उत्तम साथ दिल्यामुळे नानावटी हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ६ बाद १५४ धावा फटकाविल्या. सरासरी पावणेआठ धावांचे विजयी लक्ष्य केडीए हॉस्पिटल संघाला पेलवले नाही. अष्टपैलू प्रतिक पाताडे (२६ धावांत ३ बळी), ओंकार जाधव (२४ धावांत १ बळी) आदींच्या अचूक मध्यमगती माऱ्यामुळे प्रथमेश महाडिक (२६ चेंडूत २८ धावा), आनंद सुर्वे (२६ चेंडूत २५ धावा), सुरज जयस्वाल (२१ चेंडूत १७ धावा) यांची फलंदाजी बहरली नाही. परिणामी केडीए हॉस्पिटलचा डाव मर्यादित २० षटकात ६ बाद १२९ धावसंख्येवर संपुष्टात आला आणि नानावटी हॉस्पिटलने २५ धावांनी विजय संपादन करीत ‘ए डिव्हिजन’ अजिंक्यपदाला गवसणी घातली. आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखालील आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा गाजविणारे नानावटी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे माजी कप्तान प्रतिक पाताडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
******************************