NHI NEWS AGENCY
अंधेरीच्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटल संघाने बलाढ्य जे.जे. हॉस्पिटलचे आव्हान ४७ धावांनी संपुष्टात आणले आणि अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर हॉस्पिटल ‘ए’ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मानस पाटीलची ६ बळी घेणारी प्रभावी फिरकी गोलंदाजी व प्रथमेश महाडिकची नाबाद अर्धशतकी फलंदाजी, केडीए हॉस्पिटल संघाला शिवाजी पार्क मैदानामधील विजयासाठी उपयुक्त ठरली. नरेश शिवतरकरने कप्तानपदास साजेशी फलंदाजी करूनही अखेर जे.जे. हॉस्पिटल संघाला पराभवास सामोरे जावे लागले. अष्टपैलू मानस पाटील व कप्तान नरेश शिवतरकर यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप क्षीरसागर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व आरएमएमएस आयोजित स्पर्धेमध्ये जे.जे. हॉस्पिटल विरुध्द उपांत्य सामन्यात केडीए हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मध्यमगती गोलंदाज प्रकाश सोळंकीने दुसऱ्याच षटकात सलामी जोडी ७ धावसंख्येवर फोडली आणि जे.जे. हॉस्पिटलने केडीए हॉस्पिटल संघाला हादरविले. परंतु त्यानंतर अल्केत तांडेल (३३ चेंडूत ३३ धावा), अर्धशतकवीर प्रथमेश महाडिक (५० चेंडूत नाबाद ६१ धावा), संकेत किणी (१९ चेंडूत २७ धावा) व मानस पाटील (११ चेंडूत १५ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी करून केडीए हॉस्पिटल संघाला मर्यादित २० षटकात ३ बाद १४७ अशी आश्वासक धावसंख्या उभारून दिली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना जे.जे. हॉस्पिटल संघाची फलंदाजी ठराविक अंतराने ढेपाळली. डावखुरा फिरकी गोलंदाज मानस पाटीलच्या (१३ धावांत ६ बळी) अचूक गोलंदाजीस अष्टपैलू संकेत किणीची (४ धावांत २ बळी) उत्तम साथ मिळाल्यामुळे जे.जे. हॉस्पिटलचा डाव १७.२ षटकात १०० धावसंख्येवर संपुष्टात आला. परिणामी केडीए हॉस्पिटलने ४७ धावांनी शानदार विजय मिळवीत अंतिम फेरीत धडक दिली. कप्तान नरेश शिवतरकर (१६ चेंडूत २१ धावा) व अभिजित मोरे (२२ चेंडूत १६ धावा) यांनी जे.जे. हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी छान फलंदाजी केली. रुग्णालयीन नामवंत अष्टपैलू क्रिकेटपटू प्रतिक पाताडे-नानावटी हॉस्पिटल व डॉ. मनोज यादव-सेव्हन हिल्स हॉस्पिटल यांचा स्पर्धेनिमित्त विशेष गौरव होणार आहे.