Mumbai NHI NEWS AGENCY
अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर हॉस्पिटल ‘ए’ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मध्यमगती गोलंदाज नितीन रांजेची (१४ धावांत ५ बळी) हॅट्ट्रीक व डॉ. नवनीत रायची (१७ चेंडूत २४ धावा) धडाकेबाज फलंदाजी यामुळे नानावटी हॉस्पिटल संघाने बलाढ्य लीलावती हॉस्पिटलविरुध्द ५ विकेटने सलामीचा विजय संपादन केला. सलामीवीर सिध्देश घरत (३० चेंडूत २६ धावा) व नितीन जाधव (१६ चेंडूत २५ धावा) यांनी दमदार फलंदाजी करूनही लीलावती हॉस्पिटल संघाला पराभवास सामोरे जावे लागले. अष्टपैलू नितीन रांजे व सिध्देश घरत यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, सुरेश मोरे, लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
शिवाजी पार्क मैदानात नानावटी हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून लीलावती हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. सिध्देश घरत (३० चेंडूत २६ धावा) व विजय नाडकर (२४ चेंडूत १६ धावा ) यांच्या फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने आठव्या षटकाला बिनबाद ४५ धावसंख्येने उत्तम सुरुवात केली. प्रमुख गोलंदाज विकेटच्या प्रतीक्षेत असतांना नानावटी हॉस्पिटलचा कप्तान ओंकार जाधवने शेवटच्या अस्त्रातील मध्यमगती गोलंदाज नितीन रांजेच्या हाती चेंडू सोपविला आणि त्याने काम फत्ते केले. नितीनने आपल्या पहिल्याच षटकामधील तिसऱ्या चेंडूपासून सिध्देश घरतसह लीलावती हॉस्पिटलचे प्रमुख तीन फलंदाज लागोपाठ तंबूत पाठवून हॅट्ट्रीक साधली. नंतर नितीन रांजेने (१४ धावांत ५ बळी) आणखी दोन बळी घेत अष्टपैलू प्रतिक पाताडेच्या (११ धावांत २ बळी) साथीने लीलावती हॉस्पिटलचा डाव २० व्या षटकाला ९७ धावांत गुंडाळला. नितीन जाधवने २५ धावांची छान फलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल डॉ. नवनीत राय (१७ चेंडूत २४ धावा), ओंकार जाधव (२४ चेंडूत १७ धावा), दिनेश पवार (२० चेंडूत १७ धावा), राहुल गावित (१६ चेंडूत १२ धावा) व प्रतिक पाताडे (१३ चेंडूत नाबाद १० धावा) यांच्या फटकेबाजीमुळे नानावटी हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १८.१ षटकात ५ बाद ९८ धावा रचत साध्य केले.
******************************