मुंबई : मुंबई महापालिकेची २३६ पर्यंत ठाकरे सरकारने वाढवलेली प्रभागसंख्या पुन्हा शिंदे सरकारने २२७ वर आणून ठेवली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय रद्द करत महाविकास आघाडीला धक्का देण्याचे तंत्र शिंदे-फडणवीस यांच्या द्वी-सदस्यीय मंत्रिमंडळाने कायम ठेवले आहे. आज त्यांनी मुंबई महापालिकेची २३६ पर्यंत वाढवलेली प्रभागसंख्या पुन्हा २२७ वर आणून ठेवली.
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानंतर घेतलेले काही निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केले, तर काही निर्णयांना नव्याने मंजुरी दिली. शिवाय त्यापूर्वी घेतलेले काही निर्णयही रद्द केले आहेत. त्यापैकीच मुंबई महापालिकेचे वाढीव प्रभाग रद्द केले आहेत. महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
मुंबई महापालिकेचे प्रभाग २२७ होते. महाविकास आघाडी सरकारने त्यात ९ प्रभागांची वाढ करत ते २३६ केले. याला काही राजकीय पक्षांनी विरोध केला होता. राज्यात आणि महापालिकेत तत्कालीन सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने स्वतःच्या फायद्यासाठी हे प्रभाग वाढविल्याचा आरोप होत होता.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मुंबई महापालिकेची नवीन वॉर्डरचना रद्द करण्याची मागणी केली होती. मुंबई महापालिका देशातील सर्वात प्रतिष्ठित महापालिका असून या महापालिकेच्या निवडणुका निःपक्षपणे पार पडल्या पाहिजेत. कुठल्याही एका पक्षासाठी वॉर्डमध्ये फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे मुंबईच्या नवीन वॉर्डच्या सीमा रद्द कराव्यात, अशी काँग्रेसची मागणी होती.
या वॉर्ड रचनेतून कुणाचा फायदा आहे हे सर्वांना माहित आहे. आपल्याला या गोष्टीचे राजकारण करायचे नाही. मात्र निवडणुका निष्पक्षपणे व्हायला हव्यात, अशी काँग्रेसची मागणी होती. एकूणच राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत वॉर्ड रचना पूर्ववत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे.