मुकुंद रांजाणे
माथेरान :सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने माथेरान मध्ये पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू करावी यासाठी नुकताच चाचणी घेण्यात आली होती.ही चाचणी जवळजवळ यशस्वी झालेली आहे.त्यामुळे आगामी काळात इथे या ई रिक्षा सुरू झाल्यास आपल्या व्यवसायावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे येथील अश्वपालकांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे आणि अधीक्षक कार्यालयात जाऊन ई रिक्षाच्या विरोधात निवेदन सादर केले आहे.
वाहनास प्रतिबंध असलेले आशिया खंडातील माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे.पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या अश्वपालकांचा व्यवसाय असुरक्षित होणार आहे तसेच पर्यावरण पूरक असलेली माथेरानची ओळख पुसली जाणार आहे.आजपर्यंत येथील स्थानिक प्रशासनाने आम्हा अश्वपालकांना विश्वासात घेतले नाही.तर शासनाकडून आमच्यावर कडक निर्बंध लादले जात आहेत.आम्ही भूमिपुत्र म्हणून गावाच्या विकासासोबत राहिलो आहोत ई रिक्षामुळे आमच्या ४६० घोड्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे.नुकताच झालेल्या ई रिक्षाच्या चाचणीस आमचा पूर्णपणे विरोध आहे असे अश्वपालकांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी स्थानिक तसेच मूळ वासीय अश्वपालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.