मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ति म्हणुन ओळखल्या जाणार्या मुकेश अंबानी यांच्या राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेले आणि मुंबई चे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मतदार संघातील नवी चिखलवाडी म्हाडा वसाहत अखेरच्या घटका मोजत असून मोडकळीस आलेली आहे. या इमारतींमुळे या ठिकाणी मोठा अपघात होऊन मोठी जिवितहानी शक्यता निर्माण झाली असल्याची भीती येथील रहिवासी व्यक्त करीत असून या इमारतींचा पुनर्विकास शासनाने तात्काळ करावा अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांनी केली आहे.
अधिक माहितीनुसार, ग्रँट रोड रेल्वे स्टेशन लगत पश्चिमेस नवी चिखल वाडी परिसर असून या ठिकाणी म्हाडा वसाहतींच्या ११ इमारती असून या इमारती ४० वर्षे जुन्या आहेत. या इमारतींमध्ये जवळपास ५३० कुटुंब गेल्या ४० वर्षापासुन राहत आहेत. सध्या म्हाडाची ही वसाहत मोडकळीस आली असून या इमारतींची दयनीय अवस्था झालेली आहे. अनेक वेळा येथील इमारतीचा स्लॅब खचून अपघात झाला आहे. तसेच कुटुंबांचा विस्तार झाल्यामुळे आता येथील रहिवाशांना दाटीवाटीने राहावे लागत आहे. विशेष म्हणजे अनेक मराठी कुटुंब मुंबई तून हद्दपार झालेली असताना आता मुंबई शहरातील मुख्य भागात राहणाऱ्या मराठी कुटुंबांकडे सुद्धा म्हाडा तसेच शासन कानाडोळा करीत असल्यामुळे जिवितहानीच्या भीतीमुळे घर सोडण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मुंबईत उरलेला मराठी टक्काही कमी होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. या नवी चिखलवाडी तील रहिवाशांची नुकताच एकनाथ शिंदे यानी भेट घेतली होती मात्र पुढे काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता सदर रहिवाश्यांनी या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी स्थानिक रहिवाशी निखिल घाडी यांच्या पुढाकाराने नुकताच एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला पिंपरी चिंचवड चे आमदार अण्णा बनसोडे यांनी सदीच्छा भेट देत स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. पिंपरी चिंचवड या शहराचा कायापालट करणारे आमदार म्हणुन अण्णा बनसोडे यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. यावेळी आमदार बनसोडे यांनी या प्रकरणी म्हाडा प्रशासन तसेच इतर प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी पाठपुरावा करीत सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी मराठी माणसाचे अस्तित्व टिकले पाहिजे म्हणुन आपण सर्व रहिवाश्यांनी एकजुटीने हा पुनर्वसन प्रश्न सोडवायला हवा अशी आशा व्यक्त करीत मार्गदर्शन केले. आमदार बनसोडे यांच्या समवेत यावेळी नवी चिखल वाडी रहिवाशी संघ चे पदाधिकारी यांच्यासह या क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशांत घाडगे, सतिश लांडगे, संदीप चिंचवडे उपस्थित होते.