Mumbai/NHI
सेंट मेरी हायस्कूल-माझगाव तर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप सहकार्याने झालेल्या १६ वर्षाखालील शालेय मुलांच्या दुहेरी कॅरम स्पर्धेत आर्यन मुक्कता व इशांत मिश्रा जोडीने शंतनू वाघमारे व अवनीश जोशी जोडीचा ९-० असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. शंतनू-अवनीश जोडीने उपांत्य फेरीपर्यंत दाखविलेली चमक निर्णायक फेरीतील आर्यन-इशांत यांच्या अचूक खेळापुढे निष्प्रभ ठरली. सेंट मेरी हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर फेलिक्स डिसोझा, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, क्रीडा शिक्षक संदीप यादव, प्रॉमिस सैतवडेकर, अविनाश महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम फेरीचा सामना संपन्न झाला.
१४ वर्षाखालील निर्णायक फेरीचा दुहेरी सामना तनिष्क जाधव व स्वरीत बनसोडे विरुद्ध वेदांत मोरे व नरेन क्यादारी यामध्ये रंगतदार झाला. प्रारंभी आघाडीवर राहिलेल्या वेदांत-नरेन जोडीला तनिष्क जाधव व स्वरीत बनसोडे जोडीने ८-७ असे चकवून बाजी मारली. १२ वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत मोहमद अहमद व बाशर शेख जोडीने देवेश सिंग व आर्शियान शेख जोडीला ५-४ असे नमवून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीच्या ५५ खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या स्पर्धेतील निवडक खेळाडूंना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे डीएसओ कॅरम स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी ९ सप्टेंबर रोजी मोफत कॅरम मार्गदर्शन दिले जाणार आहे.
******************************