MUMBAI/NHI : समता विद्या मंदिर-असल्फा आयोजित शालेय कॅरम निवड चाचणी स्पर्धेत लोकेश पुजारीने अनमोल चौतनचा १०-८ असा चुरशीचा पराभव करून विजेतेपदाचा समाजरत्न सुरेश आचरेकर स्मृती चषक पटकाविला. लोकेश पुजारीने प्रथमपासून आघाडी घेतल्यामुळे उशिरा सूर सापडलेल्या अनमोलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने विनाशुल्क झालेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्याध्यापिका गीता बलोदी, सुषमा राऊत, साधुराम भर, क्रीडा शिक्षक सुनील खोपकर, संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात लोकेश पुजारीने करण गायकवाडचे आव्हान ११-५ असे संपुष्टात आणून अंतिम फेरीत प्रवेश केला. अनमोल चौतनने अविनाश कसबेला ८-० असे हरवून उपांत्य फेरी जिंकली. शालेय खेळाडूंच्या उत्स्फूर्त सहभागाने झालेल्या स्पर्धेत करण गायकवाड व अविनाश कसबेने उपांत्य उपविजेतेपद तर पवन माळी, नेहाल खान, सुरज केम्पोनूर, नेहाल खत्री यांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद मिळविले. समता विद्या मंदिरतर्फे शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून कॅरम, कबड्डी, बुध्दिबळ आदी खेळांचे विनामुल्य मार्गदर्शन क्रीडा शिबीर सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.