मुंबई : मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना व आयडियल ग्रुप-स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे झालेल्या क्रीडाप्रेमी स्व.चारुशीला मोहिते स्मृती चषक मुंबई शहर जिल्हा निवड बुध्दिबळ स्पर्धेमधील खुल्या ७ वर्षाखालील गटात नोवा अय्यरने, १३ वर्षाखालील गटात व्योम शिवमतने तर १५ वर्षाखालील गटात प्रथमेश गावडेने विजेतेपद पटकाविले. नोवा अय्यरला (४.५ गुण) ७ वर्षाखालील विजेतेपदासाठी उपविजेत्या ओम गणूने (४.५ गुण) चुरशीची झुंज दिली. परंतु दोघांच्या समान ४.५ गुणानंतर उत्तम सरासरीच्या बळावर नोवाने बाजी मारली. या गटात आर्शिव गोयलने (४ गुण) तृतीय, अनंत महेश्वरीने (३ गुण) चौथा व प्रयाण मेहताने (३ गुण) पाचवा पुरस्कार जिंकला.
आरएमएमएस सहकार्याने परेल येथे झालेल्या १३ वर्षाखालील गटात व्योम शिवमतने (४.५ गुण) प्रथम, निर्वाण शाहने (४.५ गुण) द्वितीय, रेयांश वेंकटने (४ गुण) तृतीय, राजवीर संघवीने (४ गुण) चौथा, जय इनामदारने (३.५ गुण) पाचवा तर १५ वर्षाखालील गटात प्रथमेश गावडेने (५ गुण) प्रथम, वेदांत मिस्त्रीने (४ गुण) द्वितीय, दियान झव्हेरीने (३ गुण) तृतीय, जय सामरीयाने (३ गुण) चौथा, ध्रुव जैनने (३ गुण) पाचवा क्रमांक मिळविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
**********