मुंबई/NHI. : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल गुपतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने १५ जुलै रोजी कबड्डी दिनानिमित्त शालेय कबड्डी संघांची आयडियल इंडोर कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. डॉकयार्ड रोड येथील रोझरी हायस्कूल सभागृहात मॅटवर ही स्पर्धा टायब्रेकरसाठी होणाऱ्या ५-५ चढायांमध्ये रंगणार आहे. प्रायोगिक स्वरूपातील इंडोर कबड्डी स्पर्धा यशस्वी झाल्यास शालेय सुपर लीग इंडोर कबड्डीचा धमाका सप्टेंबरमध्ये आयोजित करणार असल्याची माहिती संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी दिली.
विजेतेपदासाठी रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड, अँटोनिओ डिसोझा हायस्कूल-भायखळा, श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी, सर एली कदुरी हायस्कूल-माझगाव, ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा, ताराबाई मोडक हायस्कूल-दादर, सीताराम प्रकाश हायस्कूल-वडाळा आदी शालेय कबड्डी संघांमध्ये चुरस असेल. स्पर्धेवेळी शालेय खेळाडूंचा खेळ अधिक दर्जेदार होण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक व नामवंत कबड्डीपटू राणाप्रताप तिवारी, प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, शिक्षक राम गुदमे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिक्षक सुनील खोपकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. शालेय मुलामुलींसाठी कबड्डी नियामांवरील प्रश्नोत्तर स्पर्धादेखील १४ जुलै रोजी गोवंडी येथे होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन फादर रेव्हरंट नाईझील बॅर्रेट, क्रीडा सल्लागार अश्विनीकुमार मोरे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, सिस्टर विजया चलिल आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
**********************