मुंबई :सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर आज (३१ जुलै) रोजी छापा टाकला. ईडीच्या या कारवाईनंतर आज सकाळपासून संजय राऊतांची चौकशी केली जात आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राऊतांवरील कारवाईवर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे कारस्थान लज्जा आणि शरम सोडून सुरु आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते.
“लाज लज्जा शरम सोडून निर्लज्जपणाने हे कारस्थान सुरु आहे. हिंदुत्व बोलायचे जेव्हा कोणाचे धाडस होत नव्हते. तेव्हा शिवसेना हा एकमेव पक्ष हिंदुत्वावर बोलत होता. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा हे सगळे कोठे होते,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला केला.
उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरही एकदा भाष्ये केले. “जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल, त्याचा आदर करणे शक्यच नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. “यांना आता हिंदुत्वाचा पुळका आला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा धीर पाहिला मात्र कोल्हापूरचे जोडे पाहिले नाही, या भाषेत मी बोललो आणि बोलणारच. जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याचा आदर शक्यच नाही,” असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आज रविवार (३१ जुलै) ईडीने संजय राऊतांच्या घरावर धाड टाकली आहे. सकाळपासून राऊतांची चौकशी केली जात आहे. राऊतांना अटक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे काहीही केले तरी मी शिवसेनेतच राहणार आहे. शिवसेना सोडणार नाही. मी शेवटपर्यंत संघर्ष करणार आहे, अशी प्रतिक्रिया राऊतांनी ट्वीटमार्फत दिली आहे.