नवी दिल्ली, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी आज कच्छमध्ये ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला. “अत्यंत तीव्र चक्रीवादळ” या वर्गवारीत असलेले बिपरजॉय उद्या, 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
भारतीय हवाई दलाच्या ‘गरुड’ आपत्कालीन प्रतिसाद पथकाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज भूज हवाई दल तळाला भेट दिली. आढावा घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, “चक्रीवादळापासून जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी आमचे जवान सज्ज आहेत”.
यानंतर डॉ.मांडविया यांनी आपत्कालीन सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी भूज येथील के के पटेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली. कच्छ जिल्हा सरकारी रुग्णालये, ट्रस्ट संचालित रुग्णालये आणि प्रदेशातील इतर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि गंभीर देखभालीसाठी खाटांच्या उपलब्धतेचाही त्यांनी आढावा घेतला.
चक्रीवादळानंतर आवश्यकता भासली तर, तातडीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांच्या तयारीचाही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
डॉ मांडविया यांनी यानंतर कच्छमधील 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा चालकांशी संवाद साधला आणि सांगितले की “त्यांची तत्परता आणि सहकार्य आत्मविश्वास वाढवणारा आहे.”
“चक्रीवादळ बिपरजॉयला तोंड देण्यासाठी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी व्यवस्था केली जात आहे,’’ असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.