मुबंई : ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल होत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू केली. जवळपास १० तास चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं. आता त्यांना ईडी कार्यालयात नेऊन पुढील चौकशी आणि प्रश्नोत्तरे होणार आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी फोनवर बोलत अशा कारवायांपुढे झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
संजय राऊत म्हणाले, “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.”
“महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधकांवर राजकीय सुडाने कारवाया सुरू आहेत. त्याविरोधात माझ्यावरील कारवाईने बळ मिळेल. आमच्यासारखे काही लोक आहेत जे न झुकता, न डरता कारवायांना सामोरं जातात आणि लढाई लढतात, असा संदेश जाईल. अशा कारवायांच्या भीतीने अनेकजण पक्ष सोडून जातात, शरणागती पत्करतात. मात्र, संजय राऊत त्यातील नाही. मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ७ वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता.तब्बल नऊ तासांपासून संजय राऊत यांची चौकशी सुरू होती. अखेर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत हे तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर शिवेसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. तसेच संजय राऊत यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.