नवी दिल्ली, : जी 20 च्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातील 3 री आरोग्य कार्यगटाची बैठक सध्या तेलंगणामधील हैदराबाद येथे सुरू आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री एस पी सिंह बघेल आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांच्या उपस्थितीत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी तीन दिवसीय बैठकीचे उद्घाटन केले. जी 20 देश, अतिथी देश आणि आमंत्रित आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य हे देखील यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या पहिल्या दिवशी, जी 20 भारताच्या आरोग्यासंबंधी प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सत्रात जी 20 भारताच्या आरोग्यासंबंधी आराखड्यातील आरोग्य प्राधान्यांबाबतच्या चर्चेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. “साथीच्या रोगांचा धोका संपलेला नाही. एक आरोग्य संकल्पनेवर आधारित निगराणी प्रणालीचे एकत्रिकरण आणि मजबूतीकरण करण्याची गरज आहे.” असे डॉ. भारती पवार यांनी आरोग्य सेवा व्यवस्थेच्या सातत्यपूर्ण बळकटीकरणाच्या गरजेवर प्रकाश टाकताना सांगितले.
डॉ. भारती पवार यांनी जी 7 आणि जी 20 समुहाच्या प्राधान्यक्रमांच्या एकीकरणाची नोंद केली. “साथीचा रोग महामारी कराराच्या अंतिम स्वरूपाची प्रतीक्षा करत नाही आणि म्हणूनच, कृती करण्याची हीच वेळ आहे.” असे सांगत डॉ. भारती पवार यांनी जी 20 सदस्य देशांना या संदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नात मदत करण्याचे आवाहन केले. डॉ. भारती प्रवीण पवार यांनी उपस्थित प्रतिनिधींना भारताच्या डिजिटल आरोग्याशी संबंधित जागतिक उपक्रमाची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यवस्थापित नेटवर्कचा प्रस्ताव असलेल्या या उपक्रमात डिजिटल दुरावा कमी करण्याच्या उद्देशाने जागतिक आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये चालू असलेल्या उपक्रमांना एकत्रित करण्याचा मानस आहे.
जी 20 संयुक्त वित्त आणि आरोग्य कृती दल तसेच जी 7 द्वारे पूर्वतयारी वित्तपुरवठ्या व्यतिरिक्त, आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणा आणि संस्थांना वित्तपुरवठा करण्याच्या मुद्द्याला प्राधान्य देण्याच्या पुढाकाराचे एस पी सिंह बघेल यांनी यावेळी कौतुक केले. “भारतीय पारंपारिक ज्ञान प्रणालीने सर्वांसाठी प्रतिबंधात्मक आणि सर्वांगीण कल्याणाचा प्रसार केला.” असे आरोग्य सेवेतील पारंपारिक ज्ञानावर भर देताना जी किशन रेड्डी यांनी सांगितले.
या सत्रातील चर्चा लस, उपचार पद्धती आणि आजाराचे निदान (VTD) तसेच संशोधन आणि विकास उत्पादन नेटवर्क तयार करणे, जगभरातील (VTD) वितरणात अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम सुलभ करणे यावर केंद्रीत होती.
आज पहिल्या दिवशी द्विपक्षीय बैठका तसेच जी 20 सदस्य देशांमधील प्रतिनिधींच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.