सध्या श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. खरंतर ‘फकाट’ या शब्दाचा अर्थ काय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘फकाट’ म्हणजे नेमकं काय याचे उत्तर जरी प्रेक्षकांना २ जूनपासून मिळत असले तरी आपल्या काही तरुण मंडळींनी त्यांच्या मते ‘फकाट’ म्हणजे काय सांगितले आहे. नुकताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून अनेकांनी ‘फकाट’ चे गंमतीशीर अर्थ सांगितले आहेत.
चित्रपटाच्या टीमने काही तरुणांना ‘फकाट’चा अर्थ विचारला यावर या तरुण मंडळींनी भन्नाट उत्तरे दिली आहेत. ‘फकाट’ म्हणजे सुसाट सुटणारा, स्वावलंबी, स्वतःच्या धुंदीत राहणारा, गावाकडून आलेला एखादा मुलगा ज्याला व्यसनं लागून तो ‘फकाट’ झाला, ‘फकाट’ असे अनेक मजेशीर अर्थ या व्हिडीओमध्ये सांगितले आहेत. दरम्यान वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित या चित्रपटात हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अनुजा साठे, रसिका सुनील, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे हे सगळे कलाकार लवकरच सिनेमागृहात कॉन्फिडेन्शिल धिंगाणा घालणार आहेत.