नवी मुंबई, मुल्लानपूर आणि विशाखापट्टणम येथे ७.५ लाख चौरस फुटांच्या जागेत तीन नव्या इमारती उभारण्यात येणार
मुंबई : दरवर्षी देशभरातून सुमारे ८० हजारपेक्षा अधिक रुग्ण कर्करोगावरील उपचारासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयामध्ये येतात. उपचारासाठी आलेल्या या रुग्णांना आर्थिक व सामाजिक अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या रुग्णांना त्यांच्या घराजवळ कर्करोगावरील उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी टाटा रुग्णालयातर्फे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील टाटा रुग्णालय, पंजाबमधील मुल्लानपूर आणि आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज कर्करोग उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे.
नवी मुंबई, मुल्लानपूर आणि विशाखापट्टणम येथे ७.५ लाख चौरस फुटांच्या जागेत तीन नव्या इमारती उभारण्यात येणार आहे. या इमारती २०२७ पर्यंत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आयसीआयसीआय फाऊंडेशनकडून सामाजिक उत्तरदायित्त्व निधीपोटी जवळपास १२०० कोटी रुपये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी आयसीआयसीआयसोबत शुक्रवारी करार करण्यात आला. आधुनिक उपकरणे आणि खास मल्टीडिसिप्लिनरी तुकडीच्या मदतीने आँकोलॉजी उपचारांची ही केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर दरवर्षी किमान २५ हजार नव्या रुग्णांवर आधुनिक पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. या नव्या इमारती प्रादेशिक पातळीवर उभारण्यात येणार असल्यामुळे रुग्णांना मुंबईत येण्याची गरज भासणार नाही. तसेच देशातील अधिकाधिक कर्करोग रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.