सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग सहकारी बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मण विष्णू तावडे यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने वयाच्या ८९ व्या वर्षी मालाड-पश्चिम येथील निवासस्थानी निधन झाले. मालाड-पश्चिम येथील स्मशानभूमीत त्याचदिनी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई व कोकण विभागात त्यांनी ६ दशकाहून अधिक काळ समाजोपयोगी कार्यात हिरीरीने भाग घेतला होता. सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे ते सुपरिचित होते. त्यांच्या निधनामुळे
सहकार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याचे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष हरीश परब यांनी शोक व्यक्त करतांना सांगितले.
ल. वि. तावडे अशी त्यांची सर्वसामान्यांमध्ये ओळख होती. ते सिंधुदुर्ग सहकारी बँक मर्यादित- मुंबईचे अनेक वर्षे उपाध्यक्ष होते. तसेच सिंधुसागर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, मौजे नाटळ, खांदारवाडी-दुबळेश्वरवाडी शिक्षणोन्नती मंडळ-मुंबई या संस्थांचे माजी अध्यक्ष, वृत्तपत्र लेखक, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ-मुंबईचे माजी सरचिटणीस होते. जनसंपर्क आणि समाजातील कार्य पाहून शासनातर्फे त्यांना एस.ई.ओ. पद देखील देण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातू असा मोठा तावडे परिवार आहे.
*********************************************************