NHI/प्रतिनिधी
मुंबई :आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे आरएमएमएस सहकार्याने क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील साखळी अ गटाच्या निर्णायक सामन्यात सेव्हन हिल्स हॉस्पिटलने बाजी मारली. अष्टपैलू सुशांत गुरवच्या धडाकेबाज नाबाद शतकामुळे सेव्हन हिल्स हॉस्पिटलने कस्तुरबा हॉस्पिटलचा १४२ धावांनी मोठा पराभव केला. आंतर हॉस्पिटल ए डिव्हिजनचा अंतिम सामना माजी विजेता नानावटी हॉस्पिटल विरुध्द सेव्हन हिल्स हॉस्पिटल यामध्ये ३१ मे रोजी सकाळी ९.३० वा. शिवाजी पार्क मैदानात गौरवमूर्ती गोविंदराव मोहिते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
कस्तुरबा हॉस्पिटल विरुद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर अमोल तोरस्कर (३९ चेंडूत २६ धावा) व डॉ. मनोज यादव (२० चेंडूत २७ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सुशांत गुरवने ५ षटकार व १३ चौकारांच्या सहाय्याने शतकासह ४१ चेंडूत नाबाद ११६ धावांची शानदार आतषबाजी केली. सुशांतला रतिन मोरेने (२० चेंडूत नाबाद २६ धावा) उत्तम साथ दिल्यामुळे तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची अभेद्य भागीदारी झाली. परिणामी सेव्हन हिल्स हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात २ बाद २११ धावांचा डोंगर उभारला. डॉ. परमेश्वर मुंडे व सुनील शिंदे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. विजयी लक्ष्याच्या दडपणाखाली कस्तुरबा हॉस्पिटलची फलंदाजी बहरली नाही. स्वप्नील शिंदे, डॉ. हर्षद जाधव, ज्ञानेश्वर साळुंखे, विशाल सावंत, सुशांत गुरव यांनी विकेट घेणारी अचूक गोलंदाजी केल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलचा डाव १२.१ षटकात ६९ धावसंख्येवर संपुष्टात आला. डॉ. परमेश्वर मुंडेने ५ चेंडूत नाबाद २५ धावा फटकाविल्या. शतकवीर सुशांत गुरव व डॉ. परमेश्वर मुंडे यांनी सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकाविला.
******************************