NHI/प्रतिनिधी मुंबई : लायन्स क्लब इंटरनॅशनल-मुंबईचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित झालेल्या शालेय मुलांच्या दुहेरी विकेट क्रिकेट स्पर्धेत पुष्कर सावंत व रिषभ रावत जोडीने विजेतेपद पटकाविले. आयडियल ग्रुप व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्पर्धेमधील अंतिम फेरीत पुष्कर-रिषभ जोडीने विवान दमवाणी व वेदांत घोरपडे जोडीचा २३ धावांनी पराभव केला. पुष्कर व रिषभ यांनी अचूक गोलंदाजी करून प्रतिस्पर्ध्यांना प्रत्येकी दोन वेळा बाद केले. परिणामी विवान-वेदांत जोडीला २७ धावांचे विजयी लक्ष्य पेलवले नाही.
शिवाजी पार्क मैदानामध्ये पहिल्या उपांत्य फेरीत दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर २ धावा घेत पुष्कर सावंत व रिषभ रावत जोडीने निरव सोळंकी व निहार सावंत जोडीचे आव्हान २५-२४ अशा अटीतटीमधील एका धावेच्या फरकाने संपुष्टात आणले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात विवान दमवाणी व वेदांत घोरपडे जोडीने विवान प्रभू व शौर्य बॅनर्जी जोडीवर १८-१६ अशा २ धावांनी निसटता विजय मिळवीत अंतिम फेरीत धडक मारली होती. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी व यशोदत्त पटेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.