मुंबई NHI/प्रतिनिधी
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे आरएमएमएस सहकार्याने क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत कस्तुरबा हॉस्पिटलने साखळी अ गटात पहिला विजय नोंदविला. सलामीवीर कल्पेश भोसलेच्या अर्धशतकी फलंदाजीमुळे कस्तुरबा हॉस्पिटलने बलाढ्य जे.जे. हॉस्पिटल संघाचा ५ विकेटने पराभव केला. अर्धशतकवीर कल्पेश भोसले व अष्टपैलू अभिजित मोरे यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.
शिवाजी पार्क मैदानात कस्तुरबा हॉस्पिटल विरुद्ध नाणेफेक जिंकून जे.जे. हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी केली. महेश सणगर (१७ धावांत ३ बळी) व मंगेश आगे (१३ धावांत २ बळी) यांनी अचूक गोलंदाजी केल्यामुळे जे.जे. हॉस्पिटल संघाला २० षटकात ७ बाद १२० धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. जे.जे. हॉस्पिटलचे सुभाष शिवगण (२९ चेंडूत ३३ धावा) व अभिजित मोरे (२३ चेंडूत २५ धावा) यांनी छान फलंदाजी केली. सलामीवीर कल्पेश भोसले (४१ चेंडूत ५६ धावा), रोहन ख्रिस्तियन (९ चेंडूत नाबाद १५ धावा), मंगेश आगे (१० चेंडूत नाबाद १४ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी केल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १७.१ षटकात ५ बाद १२१ धावा फटकावून पार केले.
******************************